मुंबई I झुंज न्यूज : शिंदे गटाच्या बंडातील बिनीचे शिलेदार असलेले औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपद नाकारल्यापासून नाराज आहेत. त्यांनी काल (रविवारी) एका कार्यक्रमात ‘अतुल सावे मागून येऊन कॅबिनेट मंत्री झाले. आमच्याकडेही काही बघा,’ अशा शब्दांत भाजप नेत्यांसमोर मन मोकळे केले. राजकारणात आता सीनियारिटीचे काही राहिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आज अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाली. तेव्हा विधानसभेचे तालिका सभापती संजय शिरसाट यांची सभागृहात एन्ट्री होताच उपस्थित आमदारांनी संजय शिरसाट यांचे स्वागत करत ‘चला काही तरी मिळाल’, असा टोमणा मारला. त्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला. शिरसाट यांना देखील आपले हसू रोखू शकले नाही व आमदारांना उद्देशून आज माझी वाट लावायची ठरवले आहे का?, असा प्रतिप्रश्न केला.
“आपल्या मागून आलेले अतुल सावे हे राज्यमंत्री व आता कॅबिनेट मंत्री झाले. मात्र, आमचे काहीच होत नाही. सीनियारिटीचे आता काही राहिलेच नाही. अरे, आमचेही काही बघा ना राव, अशा शब्दांत शिरसाट यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. या विधानानंतर शिरसाट यांची आज विधानसभा सभागृहात एन्ट्री होताच ‘चला काही तरी मिळाले’, असा टोला शिरसाटांना आमदारांनी लगावला.
शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपण मंत्री होणार असा दावा शिरसाट करत होते. केवळ मंत्रिपदच नव्हे, तर कोणते खाते मिळणार, औरंगाबादचे पालकमंत्रिपद मिळणार असे दावेही त्यांच्या गोटातून केले जात होते. मात्र अतुल सावे, अब्दुल सत्तार व संदिपान भुमरे अशा औरंगाबादच्या तीन-तीन नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदे दिल्याने शिरसाट यांचा पत्ता ऐनवेळी कट झाला. त्यामुळे ते नाराज झालेत.