…तर अधिवेशनाला दारूचे कॅन घेऊन जाणार ; सुनील शेळकेंचा कामशेत पोलिसांना इशारा, पीआयच्या बदलीचीही मागणी
मावळ I झुंज न्यूज : एका दिवसात कामशेतमधील अवैध धंदे बंदे झाले नाहीत, तर उद्या अधिवेशनाला दारूचे कॅन घेऊन मंत्रालयात जाण्याचा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. कामशेत पोलीस स्टेशन परिसरातील अवैध धंदे ताबडतोब बंद करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून पोलीस स्टेशनवर बेधडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सुनील शेळके यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वांत मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या कामशेत शहरासह पोलीस स्टेशन हद्दीतील गावात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. अवैध धंद्यात दारू विक्री, गांजा विक्रीसह जुगार फोफावला आहे. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा धंद्यांना लवकरात लवकर लगाम घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘तरूण पिढी होतेय उद्ध्वस्त’
अवैध धंद्यांमुळे तरूण पिढी अक्षरशः उद्ध्वस्त होत आहे. फुग्यांमधून 20 रुपयांची दारू मिळते. ही दारू आमच्या तरुणांचे आयुष्य बर्बाद करत आहे. व्यसनाधीन तरूणांकडून समाजविघातक कृत्ये घडत आहेत. पोलीस प्रशासनाने अवैध धंदे बंद करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, असे म्हणत सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादीने हा बेधडक मोर्चा पोलीस स्टेशनवर काढला.
‘अवैध धंदे फोफावण्याला पोलीस कारणीभूत’
“अवैध धंदे फोफावण्याला सर्वस्वी कारणीभूत येथील पोलीस स्टेशनमधील अधिकारी आहेत. कोण आहे इथला पीआय? हफ्ते घेऊन धंदे करतो. पीआय येतो. एक-दोन वर्ष राहतो. करोड-दोन करोडचा मालक होतो. गोरगरीब जनतेला वेठीस धरायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे. तुमच्या खाकी वर्दीचा आम्ही सन्मान करतो आणि तुम्ही मात्र येथे येवून राजकारण करायला लागलात, धंदापाणी करायला लागलात, असा हल्लाबोल शेळकेंनी पोलिसांवर केला.
तुमच्यात प्रामाणिकपणा, धमक असेल तर आम्हाला दाखवून द्या. आता फक्त तुमच्या हद्दीतले अवैध दारूचे कॅन आमच्या कार्यकर्त्यांना तासाभरात आणले आहेत. तासाभरात पीआयची बदली केली नाही, तर हायवे बंद करणार आणि उद्याच्या अधिवेषशनाला दारूचे कॅन घेऊन जाणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.