पिंपरी I झुंज न्यूज : कोरोना काळात एकल्य (विधवा) झालेल्या महिलांची परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ठेकेदारी पद्धतीने काम उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर सचिव सीमा बेलापूरकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेतील भा. वी. कांबळे पत्रकार कक्षात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी महापालिका कामगार कर्मचारी सेना शहर अध्यक्ष रुपेश पटेकर, कोरोना काळात एकल्य (विधवा) झालेल्या महिला व त्यांचे पाल्या उपस्थीत होते.
या वेळी बेलापूरकर म्हणाल्या की, कोविड महासाथ ही मानव जातीवरील सर्वात मोठे संकट असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या च्या दुसर्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महिलांवर झालेला दिसून येतो. शहरात अनेक स्त्रिया एकल्य (विधवा) झाल्या असल्याचे आकडे समोर येत आहेत. कोरोना काळात जोडीदार गमावलेल्या महिलांनी त्यांच्या वेदना माझ्या जवळ व्यक्त केल्या आहेत. या मध्ये ३० ते ३५ टक्के तरुण विधवा आहेत. घरातील करताधरता व्यक्ती गेल्यामुळे घरातील सर्व जबाबदारीचे ओझे महिलांवर येऊन ठेपले असून पुढे जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्त्रियांच्या प्रश्नांचं वास्तव भेदक आहे. स्त्रिया आपल्या घरांमध्येही सुरक्षित नाहीत. अनेक खाजगी संस्थांनी एकल्य (विधवा) महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही स्त्रीचे मानवी हक्क नाकारले जावू नये, त्यांच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे या साठी कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांकरिता रोजगार, मुलांचे संगोपन करण्यासाठी पालिकेच्या मदतीची गरज आहे. आर्थिक मदत केल्यास काही काळ पुरेल परंतू ठेकेदारी पद्धतीने काम दिल्यास या महिला आपल्या कुटुंबाचे पालन पोशन करतील असे मत बेलापूरकर यांनी व्यक्त केले.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत आईवडिलांच्या मृत्यूनंतर खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची फी भरणे खूप कठीण झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे शाळेची फी भरु न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अडथळा निर्माण झाला आहे. कोरोना काळात एकल्य (विधवा) झालेल्या महिलांना उत्पन्नाचे कोणतेही काम व साधन नाही. कोरोना काळात दोन वर्ष शाळेचे क्लास ऑनलाईन होत होते. अचानक घरातला माणूस गेल्यामुळे फी भरणे अशक्य झाले असून खाजगी शाळेचा फी साठी जास्त त्रास होत चालला आहे. यावर महापालिकेने तातडीने पत्र काढून खाजगी शाळेला आदेश द्यावेत अशी विनंती केली होती. परंतू शिक्षण मंडळाचे अधिकारी व त्यावर नेमलेले कर्मचारी आजही त्या शाळेमध्ये पोचू शकले नाहीत. शाळेंना भेटी देऊन आत्तापर्यंत तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांची फी माफ केली आहे. आम्ही करू शकतो तर पालिका का करू शकत नाही? असा प्रश्न पटेकर यांनी या वेळी उपस्थित केला.
“या वेळी सीमा मॅडम व पटेकर सर यांनी आम्हाला शाळेची फी कमी करण्यासाठी मदत केली आहे. महापालिकेने आम्हाला काम देऊन मदत केली तर मुलांचे शिक्षण व घर खर्च करू शकतो अशा प्रतिक्रिया एकलव्य विधवा महिलांनी व्यक्त केल्या.