“हरित राजा” कार्यक्रमात अनेक आयएएस अधिका-यांची उपस्थिती
पिंपरी | झुंज न्यूज : आपल्या मुलांच्या डोक्यात मोठं होण्याचं बीज कसे पेरावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शांताराम भोंडवे होय. बीएससी (ॲग्री) शिक्षण घेऊन बँकेच्या नोकरीत न रमणारा शांताराम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उद्यान अधिक्षक म्हणून सेवेत रुजू झाला. त्यानंतर त्यांनी पर्यावरणाशी आणि वृक्ष, वल्लींशी आपला ‘स्नेहबंध’ जोडला आणि जीवनाच्या शेवटापर्यंत जपला. त्यांचा वारसा संकेत भोंडवे आणि त्यांच्या कुटूंबियांनी पुढे सुरु ठेवला आहे. पर्यावरण रक्षणाचे हे कार्य सर्वांनी सुवर्ण पिंपळाच्या बीजांचे रोपण आणि संर्वधन करीत पुढे सुरु ठेवावे असे प्रतिपादन खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त उद्यान अधीक्षक स्व. शांताराम भोंडवे यांच्या दहाव्या स्मृतिवर्षानिमित्त भोंडवे कुटूंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हरित राजा’ या कार्यक्रमात खा. पाटील यांच्या हस्ते रुद्राक्षाच्या वृक्षाचे पूजन करण्यात आले. शुक्रवारी (दि. १५ एप्रिल) पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आयएएस अधिकारी संकेत भोंडवे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम प्रशासक हरनाम सिंग, निवृत्त आयएएस अधिकारी जयराज फाटक, दिलीप बंड, हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माजी आमदार विलास लांडे पाटील, श्रीमती सुमन शांताराम भोंडवे आदींसह मुंबई, दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकारी, दावडी निमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी, श्रीकर परदेशी यांचा व्हिडीओ संदेश आणि पद्मश्री आण्णा हजारे यांचा लिखित संदेश प्रसारित करण्यात आला. तसेच उपस्थितांच्या हस्ते स्व. शांताराम भोंडवे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘हरित राजा’ या लघुपटाचे आणि “स्नेहबंध कौटुंबिक वात्सल्याचे” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, १९८२ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना आणि १९८४ साली डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाची स्थापना झाली. तेंव्हापासून पाटील आणि भोंडवे कुटूंबियांचे स्नेहबंध आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या या व्यासपीठावर एकाच वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अनेक माजी आयुक्त आणि प्रशासक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग जुळून आला. हे आमचा माजी विद्यार्थी आणि आताचा आएएस अधिकारी संकेत भोंडवे याच्यामुळे शक्य झाले. संकेत याने कमी वयात प्रशासनात मिळविलेले यश डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अभिमानास्पद आहे.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, २०१६ साली उज्जैनच्या कुंभमेळ्यात पर्यावरण पुरक आणि प्लास्टिक मुक्त कार्य कसे करावे याचे उत्तम उदाहरण संकेत भोंडवे यांनी घालून दिले आहे. भोंडवे कुटूंबियांनी दिलेल्या सुवर्ण पिंपळाचे बीज देशातील सर्व आदर्श गावात पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे आहे असे आवाहन पवार यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम प्रशासक हरनाम सिंग म्हणाले की, शांताराम भोंडवे यांनी शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी त्यावेळी केलेल्या कामामुळेच पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीचे आजही पर्यावरण उच्च पातळीवर आहे आणि प्रदूषण नियंत्रणात आहे. या ध्येयवेड्या मानसामुळेच दुर्गा देवी टेकडी सारखा अशक्य प्रकल्प शक्य झाला.
निवृत्त आयएएस अधिकारी जयराज फाटक म्हणाले की, जगातील सर्वच मोठ्या शहरांची ओळख तेथील उद्यानांच्या संख्येवर ओळखली जाते. पिंपरी चिंचवड शहरातील दुर्गा देवी टेकडी प्रकल्प आणि विकसीत करण्यात आलेल्या १८० उद्यानांमुळे शांताराम भोंडवे आणि हरनाम सिंग यांचे नाव अजरामर झाले आहे. टी. एन. शेषन सारख्या उत्तम प्रशासकांनी देखील भोंडवे यांच्या कार्याचा गौरवोल्लेख केला होता.
मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर म्हणाले की, शांताराम भोंडवे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन संकेत भोंडवे पर्यावरण आणि उपेक्षित घटकांच्या विकासासाठी कार्य करीत आहे. त्याची दखल घेऊनच संकेत भोंडवे यांना कमी वयात सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील म्हणाले की, शांताराम भोंडवे यांनी त्याच्या कार्यकाळात केलेले काम राज्यातील इतर उद्यान अधीक्षक साठी दिशादर्शक आहे. राहण्यायोग्य शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहर विकसीत करण्यासाठी हरित पट्टा आवश्यक आहे. या कामी भोंडवे यांनी केलेले काम मार्गदर्शक ठरत आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की, निसर्गाशी समरस होऊन ‘जगणं आणि जगवणं’ कसे साध्य करावे हे शांताराम भोंडवे यांनी दाखवून दिले आहे.
स्वागत प्रास्ताविक आयएएस अधिकारी संकेत भोंडवे, सूत्रसंचालन अनिल कातळे आणि आभार डॉ. अभिजीत भोंडवे यांनी मानले.