प्रांत पोलीस मित्र संघाच्या वतीने जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन
पिंपरी I झुंज न्यूज : सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण नकळत सायबरच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यामुळे सायबर क्राईम बाबत जनजागृती होणे हि काळाची गरज असल्याचे मत ॲड. पंकज बाफना यांनी व्यक्त केले आहे.
प्रांत पोलीस मित्र संघ यांच्या वतीने प्राधिकरण निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवन या ठिकाणी पोलीस कर्मचारी महिला व विद्यार्थी याच्या मध्ये सायबर क्राईम या विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता सायबर क्राईम बाबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कायदे तज्ञ व सुप्रीम कोर्टाचे वकिल अॅड. पंकज बाफना यानी प्रमुख वक्ते या नात्याने अत्यंत उपयुक्त अने मोलीक मार्गदर्शन केले.
परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी, कायदेशीर सल्लागार अँड. पियाली घोष, मे. प्रताप भोसले, अनिषा फणसाळकर, महा. उपाध्यक्ष नितीन चिचवडे, महा. उपाध्यक्ष संदीप पोलकम, देवयानी पाटील, अशोक पवार, प्रसिद्धी प्रमुख उदय निकम, सुभाष मालुसरे, आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
पोलीस कर्मचारी महिला व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना अॅड. बाफना म्हणाले की, आपल्याकडून कळत-नकळत सायबर चुका होत असतात. या चुका आपल्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या धोकादायक ठरू शकतात. या अभासी दुनियेतून आपण बाहेर कसे पडायचे हे पटकन समजत नाही. आजच्या युगात इंटरनेट सेवा हि अत्यंत अत्यावश्यक व गरजेची झालेली आहे. परंतु त्या सोबतच प्रत्येकाला अनेक समस्यानाही तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्यांवर मात करताना आपण स्वतः देखील सुरक्षित राहिले पाहिजे.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले परिमळ 1 चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की. सध्या सायबर क्राईम अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पोलीसांवर अतिरिक्त ताण आलेला आहे. जर सर्व साधारण नागरिकांमध्ये सायबर क्राईम बाबत जनजागृती झाली तर नक्कीच नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी पोलीस यंत्रणा चांगली सेवा देऊ शकते. प्रांत पोलीस मित्र संघ नेहमी अशा समाज जागृतीच्या कार्यक्रमांना प्राधान्य देत महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. म्हणून त्यांचे विशेष कौतुक करतो. परंतु, नागरिकांनीही बऱ्याच गोष्टी या मोबाईल व कॅम्पुटरच्या युगात सांभाळल्या पाहिजेत.
आजच्या युगातील सर्वांसाठी उपयुक्त अशा या जनजागृतीपर कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात सौ. स्मिता माने, दत्ता अवसरकर, यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी सरोते यांनी केले. प्रस्तावना राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी यांनी केली तर व पुणे जिल्हा अध्यक्ष संदेश लाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.