पुणे I झुंज न्यूज : पुण्यात शिवसेनेतलं इनकमिंग सध्या वाढलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या तोंडावर अनेकांनी भाजप राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधलं आहे.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सरपंच अमोल शिंदे (भाजप), सरपंच सुखदेव मांडेकर (राष्ट्रवादी), उपसरपंच गणेश मांडेकर (राष्ट्रवादी) या साऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश पार पडले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडं जड ठरणार आहे. आदित्य ठाकरेंनीही तशीच हाक दिली आहे.
स्वातंत्र्यातलं सगळ्यात मोठं तंत्र आपल्या हातात लोकतंत्र आहे. आपल्या हातात जे माध्यम आहे त्यातून देशसेवा करावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसेल. महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की आघाडी करायची याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही, असे सूचक विधान यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच किरीट सोमय्या, नारायण राणे यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवायचं, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.