मावळ I झुंज न्यूज : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने जल जीवन मिशनच्या टप्प्यात मावळ मधील ३० नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी सुमारे ३२ कोटी १९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे मावळमधील प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.
मावळातील ग्रामीण भागातील गावे व वाड्या वस्तीवरील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबावी आणि माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली यावा, याकरिता प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी मागील दोन वर्षापासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यातील २७ पुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या २७ नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात देखील करण्यात आली आहे.
तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील ३० नळ पाणीपुरवठा योजना मागील महिन्यात मिळाली होती व प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जागेची उपलब्धता, ठराव व इतर प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी (दिनांक ७ फेब्रुवारीला) वडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे ग्रामपंचायत प्रतिनिधी ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली.
नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधी, ग्रामसेवक यांनी त्यांच्या गावातील उर्वरित बाबी लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक पूर्ण करून घ्याव्यात व अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून तात्काळ पुढील कारवाई करून घ्यावी, अशा सूचना आमदार शेळके यांनी दिल्या होत्या.
आमदार शेळके यांनी शासनाकडे व अधिकाऱ्यांकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे मावळ तालुक्यातील ३० नळ पाणीपुरवठा योजना दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी मिळून प्राप्त झाल्या आहेत.
निगडे ९२ लाख, कलाट कोटी ७२ लाख, मुंडावरे 32 लक्ष, पुसणे १ कोटी ३२ लाख, शिरे ३६ लाख, खाडशी १ कोटी ११ लाख, पाचने १ कोटी ५१ लाख, वलक ६६ लाख, वडिवळे ४० लाख, नवलाख उंबरे १ कोटी ९२ लाख, बधालेवाडी १ कोटी ४७ लाख, जाधववाडी ९३ लाख, मुंढेवाडी १ कोटी १९ लाख, कुसवली ४३ लाख, नागाथली ४५ लाख, बेडसे ९७ लाख, सांगवी ८५ लाख, वरसोली १ कोटी ९९ लाख, पांगळोली ६२ लाख, कशाळ १ कोटी ६९ लाख, किवळे १ कोटी ४९ लाख, मळवडी ७४ लाख, थुगाव १ कोटी ०८ लाख, वारु ८० लाख, डावली १ कोटी ३० लाख, गोडुंब्रे ८८ लाख, कडेधे १ कोटी ९५ लाख, धामणे १ कोटी ४० लाख, आंबेगाव ३६ लाख, आढले १ कोटी ९७ लाख या निधीसह या गावांचा योजनेत समावेश आहे.