औरंगाबाद I झुंज न्यूज : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, मास व परिवर्तनवादी विद्यार्थी संघटनांनी नुकताच ‘क्रांतीज्वाला’ कविसंमेलनाने अभिवादन केले. कडाक्याच्या थंडीत कविंनी सामाजिक समतेच्या तरल कविता सादर करून विचारांची ऊब निर्माण केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाय कॉर्नरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांच्या हस्ते ज्वाला पेटवून कविसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.आपल्या क्रांतिनायिकेला अशा अभिनव पध्दतीने अभिवादन करणाऱ्या युवकांना पाहून देशाचे भवितव्य नक्कीच आश्वासक असल्याचे डॉ. करपे यांनी नमूद केले.
कविसंमेलनाच्या अध्यक्ष प्रा. प्रतिभा अहिरे यांनी सावित्रीबाईंच्या क्रांतिकार्याचे ऋण अधोरेखित करणारी कविता पेश केली….
“साऊ तुझ्या वाटेनं जाईन म्हणते,
तुझं गित क्रांतिचं गाईन म्हणते…
रेखलीस क्रांती रेखा काळाच्या ललाटी
ते ललाट दुनियेला दावीन म्हणते…
प्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी पुढील काव्यपंक्ती अभंगाच्या रूपात सादर केल्या…
“जगणे असावे, पाखरांच्या परी..
भार दुसऱ्यावर टाकू नये…
दैवालाच दोष देणे बरे नाही
कर्म सर्व काही सोडू नये…
शोषकांना गर्भित ईशारा देणारी कविता सुनील उबाळे यांनी सादर केली….
“क्या आपको लगता है,
गांधीपथपर सब शांतीदूत रहते है…
क्या आपको डर है,आंबेडकरनगर से कोई सुरज निकल आएगा..!
पंजाबराव मोरे यांनी गेय स्वरुपात स्रीचे दैन्य,शोषण मांडले…
“विटले कान रोज ऐकता, समसमानतेच्या कथा
रोज अत्याचाराच्या गाथा गं..कुणी कुणाला सांगाव्या व्यथा…”
गिरीश जोशी यांनी सावित्रीबाईंच्या लढ्याला शब्दबद्ध केले….
“संघर्ष सारखा केला अन् ज्ञानाचा भरला पेला…
जोतिबांच्या संगे राहून हा पाया कळसा नेला..”
प्रा.भगवान गव्हाडे यांनी आपल्या नायकांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले…
“वाणी मिलेगी दलित-बहुजन आदिवासी को…
जब स्मरण करेंगे मुकनायक का…
जब संकल्प लेंगे रमाई-सावित्रीमाईका….”
प्रा.रामप्रसाद वाव्हळ यांनी आजच्या वास्तवाचे दाहक रूप नेमक्या शब्दात ऊभे केले—-
“हा गडद होत चाललेला अंधार, आर्त किंकाळ्या… तांडव
माणसं भुकेली,दुभंगलेली…
मी कवी आहे असा आत्मघात करून घेणार नाही…”
या अशा दाहक कवितांनी उपस्थितांना विचारप्रवण केले.
प्रास्ताविक दादाराव कांबळे यांनी केले. ईतिहासकारांनी सावित्रीबाईंचे विविध क्षेत्रातील योगदान जाणिवत:दुर्लक्षिले आहे. त्या आधुनिक मानवतावादी पहिल्या कवियत्री आहेत, म्हणून त्यांना कवितांनी अभिवादन करण्यासाठी हे कविसंमेलन आयोजित केले असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. फुलचंद सलामपुरे, अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमाळे,प्रा. गितांजली बोराडे,किरण काळे याप्रसंगी लोकेश कांबळे, प्रा.उमाकांत राठोड,चित्रकार राजानंद सुरडकर, किरण राठोड,राजेश मुंडे,प्रा.रविंद्र शिंदे,अच्युत कुलकर्णी, प्रा.शिंपले,दिक्षा पवार, अर्चना वाठोरे,आशा राठोड,ज्योती गावंडे, मनोज कांबळे,दैवत सावंत,आकाश लोणकर, किरण काळे,अँड.योगेश अतकरे, सादिक शेख आदिंसह विद्यार्थी कडाक्याच्या थंडीतही उपस्थित होते. बहारदार सुत्रसंचालन धम्मपाल जाधव यांनी केले.आभार विकास गवई यांनी मानले.