पिंपरी I झुंज न्यूज : कोविडचे नियम पाळुन परंपरा खंडित न होण्यासाठी सार्वजनिक मंडळांना निशुल्क स्टेज परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
काय म्हणाले आहेत मारुती भापकर ?
सार्वजनिक गणपती उत्सव एक दिवसावर आला असून सार्वजनिक मंडळांना श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी छोटा स्टेज बनवण्यास पोलीस प्रतिबंध करत असून महापालिकेच्या परवानगीशिवाय तुम्हाला स्टेज उभारता येणार नाही असे पोलिस बोलत आहेत.
महापालिकेची स्टेजसाठी परवानगी प्रभागात मागण्यासाठी गेले असता आम्हाला आयुक्तांचे आदेश नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला स्टेजसाठी परवानगी देऊ शकत नाही. आयुक्तांना या बाबत आपण प्रभाग स्तरावर याबाबत काही आदेश दिले आहेत का असे विचारले असता मला शासनाकडून तसे आदेश नाहीत. अशी भूमिका ते घेत आहेत. महापौरांना याबाबत बोलले असता मी आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे आसे त्या सांगत आहेत. सत्तारूढ पक्षनेते यांच्याशी या विषया बाबत बोललो असता मी आयुक्तांशी बोलतो असे ते सांगतात. विरोधी पक्षनेते यांच्याशी याबाबत बोललो असता पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त उद्या याबाबत योग्य निर्णय घेतील असे ते सांगतात. कोविड महामारीचा काळ सुरू आहे.
या काळात काही बंधने पाळणे हे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी कार्यकर्ते पाळतीलच मात्र महापालिका व पोलिस प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे श्री गणराया नक्की कुठे बसणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.कोविड मुळे वर्गणी जमा होत नाही. असे असताना कार्यकर्ते परंपरा खंडित होऊ नये म्हणून स्वखर्चाने साध्या पद्धतीने दोन वर्ष हा उत्सव साजरा करतात खरेतर महापालिकेने जुन्या मंडळांना प्रत्यकी दहा दहा हजार रुपये अनुदान दिले पाहिजे.
तसेच निशुल्क स्टेजसाठी परवानगी दिली पाहिजे. तसे न करता महापालिका व पोलिस प्रशासनामध्ये कुठलाहि समन्वय न ठेवल्यामुळे आज मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते यांच्या भावभावनांचा विचार करून कोविडच्या अटी शर्ती पाळुन काही निर्बंध घालून परंपरा खंडित होऊ न देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.