भोसरी I झुंज न्यूज : ५ सप्टेंबर, शिक्षक दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा ४०० फूट उंची असलेला मोरोशीचा भैरवगड भोसरी येथे नोकरीनिम्मित राहणारे व मूळचे सातारचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली सर करीत अभिमानाने तिरंगा फडकावित, ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांना व जन्मदात्या आईला सलाम करीत केलेली ही साहसी मोहीम समर्पित केली.
या मोहिमेची सुरवात मोरोशी गाव, ता.मुरबाड, जि.ठाणे येथून झाली. घनदाट जंगलातून दोन तासांची पायपीट केल्यावर भैरव माची येथून भैरवगडाचे रांगडे रूप नजरेस पडते. येथून गडाजवळ गेल्यावर एक वळसा घालून पायथ्याशी असलेल्या खिंडीत पोहोचता येते. भैरवमाची ते खिंड हा खड्या चढाईचा मार्ग ही खडतर आहे.
येथून गडावर जाणाऱ्या कातळ कड्यावर कोरलेल्या पायऱ्या आहेत. या ठिकाणी तोल सांभाळत, शरीर कड्याच्या बाजूने ठेवत जपून पाऊल टाकावे लागते. लगेच एक छोटी गुहा आहे. पुढे सर्वात कठीण ओव्हरहँग चा टप्पा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. हा टप्पा पार करताना पायरीमार्ग निमुलता होत जात शेवटी अगदी नष्ट होऊन जातो. यामुळे हा टप्पा पार करताना सरळ न जाता आडवे जावे लागते व खडकात हातांच्या आणि पयांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते. पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा निसारडा मार्ग, एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने सावधानतेने पार करावा लागतो.
पायरी मार्ग संपल्यावर दोन पाण्याचे टाक्यांच्या पुढील वाट निवडुंगाच्या जाळीतून पूर्व पश्चिम पसरलेल्या अरुंद गडमाथ्यावर घेऊन जाते. ४०० फूट उंच अजस्त्र आणि खडी कातळभिंत, काळजाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, सरळसोट कातळकडा, घनदाट जंगलातील पाऊलवाट, मुसळधार पाउस, धुक्यात हरवलेला परिसर, अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या, निसारड्या पायऱ्या आणि एका बाजूला खोल दरी अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.
अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या चेतन शिंदे, जाॅकी साळुंखे, अर्चना गडधे यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहक रोहित जाधव डॉ.समीर भिसे, शिवाजी जाधव, अथर्व शेटे, ज्योती राक्षे-आवरी, विजय बधाले, राजू साळवे, प्रशांत तांबे, महादेव गारगोटे, अभिषेक गारगोटे, रविंद्र सहाणे या गिर्यारोहकांनी गडमाथा गाठत अभिमानाने तिरंगा फडकावित, गुरुजनांना सलाम करीत, साहसी मोहीम शिक्षकांना समर्पित केली.
“आज शिक्षक दिन आणि माझी आई शिक्षिका आहे तसेच तिजा जन्मदिवस पण आहे जिने मला घडवलं अश्या माझ्या आईला आणि माझ्या गुरूंना ही माझी मोहीम समर्पित करतो…
(गिर्यारोहक रोहित जाधव)