शिवसेनेतर्फे कर्जत उपजिल्हा रुग्णालय, खोपोलीतील रुग्णालयाला मॉनिटर आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स भेट ; खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार

कर्जत I झुंज न्यूज : शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सहकार्याने आणि मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून कर्जत उपजिल्हा रूग्णालयाला पाच पॅरामिटर असलेले मॉनिटर आणि दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स भेट देण्यात आले आहेत. तसेच खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयालाही दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले. त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे.

कर्जत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची रुग्णसेवा दिली जात आहे. या रुग्णालयाला पाच पॅरामिटर असलेले मॉनिटर आवश्यक होते. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची कमतरता जाणवत होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घेतला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सहकार्य केले.

खासदार बारणे यांच्या हस्ते रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडे पाच पॅरामिटर असलेले दोन मॉनिटर आणि दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स सुपूर्द केले. शहरप्रमुख भालचंद्र जोशी,माजी नगरसेवक संतोष पाटील,नगरसेवक विवेक दांडेकर, दिनेश भोईर उपस्थित होते. कर्जत उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचे आहे. ऑक्सिजन पाइपलाइन देखील आहे. कोरोना काळात 70 हून अधिक रुग्ण चांगले उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत.

खासदार बारणे म्हणाले, “कोरोना कालावधीत ग्रामीण रुग्णालये नागरिकांसाठी वरदान ठरत आहेत. या रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार केले जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला होता. नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराची सुविधा निर्माण झाली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. ग्रामीण रुग्णालयाला श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन, शिवसेना पक्ष आणि शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून वैद्यकीय सामुग्रीची मदत केली जात आहे. संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाताना वैद्यकीय उपकरणाची कमतरता भासू नये, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

दरम्यान, खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयालाही दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सुमन औसरमल, सभापती मोहन औसरमल, उपाध्यक्षा विनिता औटी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शेटे, गटनेते, शहरप्रमुख सुनिल पाटील, मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर,एकनाथ पिंगळे, नगरसेवक राजु गायकवाड, संदिप पाटील, तुकाराम साबळे, नितीन पवार, नगरसेविका माधुरी रिठे, तात्या रिठे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *