पिंपरी I झुंज न्यूज : गाव पातळीवर रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र तयार करण्यात यांसह अनेक विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही करा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अजिंक्य दिलीप बारणे यांनी केली आहे. या संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या ?
१.) कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे पूर्ण देश त्रस्त आहे. त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या नेतृत्वाखाली रुग्णसंख्येत मोठी घट आणण्यात यश मिळवले आहे. परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लवकरच देशात तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे .आणि लहान मुलांना याचा अधिक धोका असण्याची माहिती तज्ज्ञांकडून सांगितली गेली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात एकाच महिन्यात ८००० लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आलेली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु व्यवस्थित नियोजन केल्यास हा धोका आपल्या शहरात पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तरी गाव पातळीवर रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र तयार करण्यात यावे. तसेच लहान मुलांना कोरोना लसी उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलांना इन्फ्लुएंझा लस देण्याचे नियोजन करण्यात यावे जेणेकरून त्यांना आजार विरुद्ध लढण्यासाठी एक चांगली रोग प्रतिकार शक्ती तयार होईल आणि तिसऱ्या लाटेचा धोका काहीसा टाळता येईल.
२.) कोरोना महामारीची दुसरी लाट काहीशी आटोक्यात आणण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, पण संचारबंदीचे नियम शिथिल किंवा कालांतरानं रद्द करण्यात आले तर मोठ्या संख्येत लोक घरातून बाहेर पडतील जेणेकरून संक्रमणाचा धोका पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढेल व बरेच लोक जीव देखील गमावतील. तरी आम्ही आपणांस सुचवू इच्छितो कि, येत्या १ ते २ महिन्यात जर आपण शहरातील प्रत्येक नागरिकाला लसीचा फक्त एक डोस देण्यात जर यशस्वी झालो तर नवीन रुग्णसंख्या व त्यांच्या दगावण्याचे प्रमाण हे आपण ९० % पर्यंत कमी करू शकू असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तरी आपणास विनंती आहे कि आपण मोठ्या प्रमाणात लस खरेदी करण्याचा पूर्ण प्रयतन करावा आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला लस द्यावी. जेणे करून कोरोनाचा धोका येत्या वर्षात आपल्या शहरातून हद्दपार करता येईल.
३.) दुसऱ्या लाटेतील सर्वात मोठं संकट जाणवले ते ऑक्सिजन उत्पादन व त्याच्या पुरवठ्या बाबत. एका खूप मोठ्या संकटाला आपण लढा देत असताना ऑक्सिजन टंचाईचे एक खूप मोठे आवाहन आपल्या समोर उभे राहिले व ते देखील आपण उत्तमपणे हाताळण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्या लाटेचे संकट जर आपल्या शहरात आले. तर मात्र या आव्हानाला आपल्याला समोर जात असताना काही उपाय योजना करणं खूप महत्वाचे राहील. तरी शहरातील सर्व शासकीय रुग्णालयमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांट्स ची स्थापन लवकर करण्यात यावी. जेणे करून लिक्विड ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्यास या प्लांट्सच्या माध्यमातून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात व सुरळीत उपलब्ध होईल, व जेथे हे प्लांट्स उभारण्यात येतील त्या आवारात मोठ्या संख्येने वृक्ष लागवडी वरती देखील भर देण्यात यावी.
४.) तसेच दुसऱ्या लाटेत कोरोना पासून बरे झालेल्या बऱ्याच रुग्णांना फंगल आजाराचा त्रास जाणवला आहे व काही लोकांना औषध उपलब्ध न झाल्याने व उपचारा अभावी स्वतःचा जीव गमावला आहे. तरी मुकर्मयकॉसिस या आजाराचे औषध लवकरात लवकर रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावे जेणे करून या आजाराने कोणाला हि जीव गमवावा लागू नये.