पिंपरी | झुंज न्यूज : कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या १३ महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अदा करण्यास आज स्थायी समितीने मंजूरी दिली. याखर्चासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे १८ कोटी ६८ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या २३ कर्मचा-यांचा कोरोना बाधित होऊन मृत्यू झाला. यातील १३ कर्मचा-यांच्या वारसांना विमा योजनेनुसार २५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मृत पावलेल्या कर्मचा-यांमध्ये अनंत काळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेडगे (मजूर), शोभा भुजबळ (स्टाफनर्स), ज्ञानेशर जाधव (वॉर्डबॉय), भालचंद्र राऊत (एमपीडब्लू), मोहम्मद शेख (लिफ्टमन), सिध्दार्थ जगताप (उपलेखापाल), तानाजी धुमाळ, तायप्पा बहिरवाडे (रखवालदार), संभाजी पवार (शिपाई), अनिल ठाकूर (क्लिनर), साईनाथ लाखे (कार्यालयीन अधिक्षक) यांचा समावेश आहे. यांच्या वारसांना विमा रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित १० कर्मचा-यांच्या वारसांनादेखील विमा रक्कम देण्याचे प्रस्तावित आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. दिव्यांग विकासाच्या योजना क्र. १३ अन्वये सुरू करण्यास तसेच विद्यार्थाबरोबरच शहरातील ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ठिकाणच्या दिव्यांग, कर्णबधीर व १०० टक्के अंध नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवास करण्याचा पीएमपीएमएल चा मोफत पास देण्यास मान्यता देणेत आलेली आहे. एकूण २४०४ पासेस करीता सुमारे २ कोटी २० लाख रुपये खर्च होणार आहेत. मनपा हद्दीतील एचआयव्ही एडस् बाधीत व्यक्तींना देखील पीएमपीएलचे मोफत बसपास देण्यास मान्यता देण्यात आली.
मासुळकर कॉलनी ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २२ लाख, तर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे अद्यावत पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी २९ लाख, किवळे गावठाण भागातील रस्त्याचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी २८ लाख, प्रभाग क्र. ५ मधील ड्रेनेज लाईन आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ३० लाख, प्रभाग क्र. २१ मधील नव्याने ताब्यात आलेले रस्ते एमपीएम पध्दतीने विकसीत करण्यासाठी ३० लाख, प्रभाग क्र. ५० मध्ये प्रसुनधाम शेजारी १८ मीटर डीपी रस्त्यावर थेरगाव चिंचवड दरम्यानचा पुल बांधण्यासाठी ६२ लाख तसेच मासुळकर कॉलनी, यशवंतनगर, उद्यमनगर परिसरातील महापालिका शाळा इमारतींच्या दुरुस्तींची कामे करण्यासाठी ५१ लाख खर्च केले जाणार आहेत. याखर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.