शिरूर I झुंज न्यूज : दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर काढून ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पिता राजेंद्र भुजबळ यांनी दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ या दोघी मुलींसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं.
विहिरीकाठी चपला आढळल्या
तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला तिघांच्या चपला आढळल्या. मोठ्या माणसाच्या चपलांसोबत लहान मुलींच्या चपला दिसल्या. त्याच्याबरोबर मोबाईल आणि पैसेही पडलेले असल्याचे दिसून आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.
तिहेरी आत्महत्येच्या घटनेने तळेगाव ढमढेरे गावात एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ बापलेकींच्या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिक्रापूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. तर पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.