पुणे | झुंज न्यूज : ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज ६ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. आपल्या कारकिर्दित त्यांनी अनेक नावाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं.
श्रीकांत मोघे यांचा ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे जन्म झाला होता. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं होतं. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प. कॉलेजात गेले. मुंबईत त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे यांनी ६० हून अधिक नाटकांत आणि ५० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिलं जायचं. वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा असो की पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख आहे.
श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
– महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००५-०६)
– काशीनाथ घाणेकर पुरस्कार (२०१०)
– केशवराव दाते पुरस्कार (२०१०)
– अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार (२०१०)
– सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
– गदिमा पुरस्कार (२०१३)
– महाराष्ट्र सरकारचा २०१४ चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
– महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार