पिंपरी | झुंज न्यूज : कु. वेदिका शिंदे ही पुण्यामधील भोसरी येथील रहिवासी सौरभ शिंदे व स्नेहा शिंदे यांची एकुलती एक मुलगी. वेदिका ला एसएमए प्रकार – १ (SMA ( spinal muscular atrophy ) type -1) हा दुर्मिळ आजार झाला आहे. हा आजार खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायूंना कुमकुवत करतो व जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते व वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.
वेदिका आत्ता ८ महिन्यांची आहे आणि तिला या समस्या सुरू झाल्या आहेत. वेदिका पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेदिकाला पुढील दोन महिन्यांमध्ये लस देण्याची आवश्यकता आहे. दोन महिन्यांच्या आत मध्ये लस दिली तर वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊ शकते.
लसीचे नाव – झोलगेन्स्मा (Zolgensma) असे आहे. ही लस अमेरिकेमधून आयात करावी लागणार आहे व या लसीची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची ताकत वेदिका च्या पालकांची नाही, ही लस मागवण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे तरी भारतामधील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमामध्ये पुढे येऊन जास्तीत जास्त मदत करावी अशी अपेक्षा आहे. तर आणि तरच वेदिका तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते.
मदत करण्यासाठी या ठिकाणी करू शकता संपर्क
या बारकोड द्वारे मदत करू शकतो.
“गूगल पे – फोन पे नंबर”
९९२२०९८८८५
आपल्या सर्वांच्या मदतीमुळे आपण या चिमुकलीला जीवदान देऊ शकतो व या लसीच्या मदतीने वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते. वेदिका च्या पालकांची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपापल्या परीने जितकी होईल तितकी मदत करावी अशी आशा समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राची कन्या वेदिका हिला वाचवण्यासाठी समाजाच्या तळागाळातील लोकांनी पुढे येण्याचे आव्हान आज महाराष्ट्राच्या समोर आहे आणि महाराष्ट्रातील जनता हे आव्हान स्वीकारून वेदिका ला या आजारातून बाहेर काढेल असा ठाम विश्वास वेदिका च्या आई वडिलांनी व्यक्त केला आहे.