ड्रग्ज प्रकरण : भाजप नेत्याला दोन मुलांसह अटक ! ; पोलिसांची मोठी कारवाई

कोलकाता I झुंज न्यूज : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बंगाल भाजपाच्या अडचणी वाढत आहेत. ड्रग्ज प्रकरणात भाजपा कार्यकर्ती पामेला गोस्वामीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. आता त्यानंतर या प्रकरणात आणखी एक भाजपा नेता राकेश सिंहला अटक करण्यात आली आहे. बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पामेला गोस्वामीनं अटकेनंतर राकेश सिंहवरच आरोप केले होते. पोलिसांनी यावेळी राकेश सिंहच्या दोन्ही मुलांना देखील अटक केली आहे.

राकेश सिंह भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या जवळचे मानले जातात. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून त्याचं नाव पुढं आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीला राकेशनं कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळताच त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याबद्दल त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पामेला गोस्वामींनी केले होते आरोप

भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याच्या सरचिटणीस पामेला गोस्वामीला १९ तारखेला अटक करण्यात आली होती. त्यांच्या गाडीमध्ये लाखो रुपयांचा अवैध कोकेन सापडला होता.

या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी पामेलानं राकेश सिंहवर आरोप केले होते. ‘वरिष्ठ भाजपा नेत्याच्या जवळच्या असलेल्या राकेश सिंहनं मला या प्रकरण्यात अडकवण्याचं षडयंत्र केलं आहे. माझ्याकडे याचे सर्व पुरावे असून या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी पामेलानं केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *