– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
– ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’
पिंपरी । झुंज न्यूज : देशभरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्य न्यायालयात ही याचिका फेटाळून लावली जाईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तमिळनाडूतील जल्लिकट्टू आणि कर्नाटकातील कंबाला या रेड्यांच्या शर्यतींना दिलेल्या परवानगीचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका ‘द पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ (पेटा) संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि राज्य सरकारने यामध्ये सकारात्मक लक्ष घालण्याची विनंती केली.
देशात बैलगाडा शर्यतींना व पारंपरिक खेळांना परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दि. १८ मे २०२३ रोजी दिला होता. त्या निकालामध्ये त्रुटी असल्याने निकालाचा फेरविचार करणे आवश्यक आहे, अशी भूमिका ‘पेटा’ संस्थेने या याचिकेत मांडली आहे. त्यामुळे शेतकरी, गाडामालक आणि बैलगाडा प्रेमींची चिंता वाढली आहे.
दरम्यान, याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधान भवन येथे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बैलगाडा शर्यती आणि पुर्नविचार याचिकेबाबत चर्चा करण्यात आली.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने शर्यती सुरू करण्याबाबत निकाल दिला आहे. परंतु, लोकशाही असल्यामुळे विरोधी पक्षकार पुनर्विचार याचिका दाखल करु शकतात. पुनर्विचार याचिकेचा फारसा परिणाम होणार नाही. पण, राज्यातील शेतकरी, गाडामालक, बैलगाडा प्रेमींनी शासनाच्या नियमांप्रमाणेच शर्यतींचे आयोजन करावे. नियमांचे काटेकोर पालन करावे. ज्यामुळे भविष्यात शर्यतींबाबत कोणतीही अडचण येणार नाही.