कसब्यात ५०.०६ तर चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान ; घटलेल्या टक्क्याचा लाभ नेमका कोणाला होणार…?

पुणे I झुंज न्यूज : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे ५०.०६ टक्के आणि ५०.४७ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. येत्या गुरुवारी (दोन फेब्रुवारी) मतमोजणी होणार आहे.कसब्यात सन २०१९ च्या निवडणुकीत ५१.५४ टक्के, तर  चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणूक असल्याने मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडणार नाहीत ही भीती खरी ठरली. कसब्यात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दीड टक्के मतदान कमी झाले.

Chinchwad Potnivdnuk

सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदानाला पहिल्या दोन तासांत नऊ वाजेपर्यंत कसब्यात ६.५ टक्के मतदान झाले होते. सकाळी लवकर उठून सजग पुणेकरांनी मताधिकार बजावला. मात्र, त्यानंतर ११ वाजेपर्यंत यात केवळ १.७५ टक्के वाढ होऊन एकूण ८.२५ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या वाढू लागली आणि अनेक केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. विशेषत: पूर्व कसब्यात मतदारांच्या रांगा दिसून आल्या, तर पश्चिम कसब्यात काहीसा निरुत्साह होता. उन्हाचा चटका जसजसा वाढत होता तसतशी मतदारांची संख्याही वाढत गेली. एक वाजेपर्यंत १८.५० टक्के, तीन वाजेपर्यंत ३०.०५ टक्के, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४५.२५ टक्क्यांवर गेला. सायंकाळी सहानंतर मतदानाची वेळ संपल्याने केंद्रांचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गंजपेठेतील सावित्रीबाई फुले शाळेत रात्री साडेसातपर्यंत मतदान सुरू होते.

दरम्यान, चिंचवडमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.५२ टक्के, दुपारी ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत २०.६८ टक्के, तीन वाजेपर्यंत ३०.५५ टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४१.१ टक्के मतदान झाले. चिंचवडमध्ये एकूण ५०.४७ टक्के मतदान झाले.

चित्रीकरणाच्या माध्यमातून प्रक्रियेवर लक्ष
“जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. त्यानुसार ३९० मतदान केंद्रांवरून होत असलेल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून या प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी झालेल्या प्रात्यक्षिक मतदानावेळी नऊ ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. ही यंत्रे तातडीने बदलण्यात आली. पर्यायाने मतदानाचा खोळंबा झाली नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *