कोल्हापूर I झुंज न्यूज : श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ इथे सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा दरम्यान काही गायींचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गायींचा झालेला मृत्यू ही मनाला वेदना देणारी बाब आहे, अशी माहिती श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाकडून देण्यात आली आहे.
कणेरी मठाच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून हजारो गायींचा सांभाळ केला जातो. त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भटक्या गायींना कोणी वाली नाही, अशा जनावरांनाही कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन-पोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठीदेखील नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावरावर निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातींच्या गायी, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाही घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
अशावेळी गायींचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायी बाब आहे. एखाद्याच्या अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली ? याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईल, पण यामुळे कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती, असं मठाकडून सांगण्यात आलं आहे.
मठाने नेहमी पत्रकार बांधवांचा सन्मान केला आहे, तसेच पत्रकार बांधवांनी ही नेहमी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे व नेहमीच अमुल्य सहकार्य केलेले आहे व करत आहेत. तरी आज कोणी खोडसाळपणे पत्रकार बांधवांच्या बाबतीत गैरप्रकार केला त्याबद्दल आम्ही व्यवस्थापनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत, असंही स्पष्टीकरण मठाकडून देण्यात आलं आहे.