(प्रतिनिधी : सुरंजन काळे )
आंबेगाव I झुंज न्यूज : ‘अंगठा दिल्याशिवाय धान्य मिळेना’, ‘अंगठा आहे, पण मशिन चालेना’, मशिनचा सव्हर सारखा डाउन होत असल्याने दुकानदार त्रस्त झाले असून, शिधाधारकांना दिवस दिवस दुकानाबाहेर ताटकळत उभे राहण्याची वेळ येत आहे, तरी शासनाने सर्व दुकानदारांना ५-जी पॉस मशिन तातडीने देऊन वाटप सुरळीत करण्याची मागणी होत आहे .
आंबेगाव तालुक्यात एकूण ११९ स्वस्त रेशन दुकान असून, त्यामध्ये एकूण ४३,००३ शिधाधारक कुटुंब आहेत. सदस्य संख्येनुसार त्यांना तांदूळ व गहू याचे वितरण केले जाते, परंतु सध्या या वाटपाला ब्रेक लागला आहे.
पॉस मशिनचा सर्व्हर सारखा डाऊन होत असल्याने दिवसभर नागरिकांना रेशनिंग दुकानाबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे, ही परिस्थिती आंबेगाव तालुक्यासह जिल्ह्यात असल्याने सर्व त्रस्त आहेत.
अनेक कुटुंबांची चूल या मिळणाऱ्या शिधेतून पेटते, परंतु महिना संपत आला तरी शिधा मिळेना, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. या पॉस मशिन राज्य शासनाने २०१६ मध्ये सर्व रेशन दुकानदारांना दिल्या आहेत, परंतु आता दिवाळीपासून सर्व्हर सारखा डाऊन होत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.
“घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील रेशन दुकानात सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नोव्हेंबर महिना संपला तरी निम्मे वाटपसुद्धा झाले नाही. घोडेगाव अंतर्गत १५०० शिधाधारक असून, निम्म्या धारकांनादेखील अजून रेशन मिळाले नाही. गेले १० ते १२ दिवसांपासून लोक शेतातील कामे सोडून रेशनिंग दुकानात येतात, पण त्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर पुरवठा विभाग काहीच बोलायला तयार नसून नुसते वरतून सर्व्हर चालू झाला की कळवतो असे बोलले जात आहे.