पिंपरी । झुंज न्यूज : पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांनी तुफान प्रतिसाद दिला. सुमारे २५ हजार हून अधिक नागरिकांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र अशा विविध संस्था-संघटनांसह शाळा-महाविद्यालयांच्या पुढाकाराने ‘‘रिव्हर सायक्लोथॉन- २०२२’’ चे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचा शुभारंभ राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ सायकलपटू प्रिती म्हस्के, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित होते.
अविरत श्रमदान संस्था आणि संयोजन समितीचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, डॉ. अश्विनी वानखेडे, रविकिरण केसरकर, सीमा शादबार, तृतीय पंथी प्रतिनिधी गायत्री थेरगावकर यांच्यासह विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधी रॅली यशस्वी करण्यात पुढाकार घेतला.
अविरत श्रमदान व संयोजन समितीचे प्रमुख डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि सर्व संस्था-संघटनांच्या पुढाकाराने एकूण २० हजार १०३ नागरिकांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. रॅलीच्या ठिकाणी ३ हजारहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली. त्यामुळे सुमारे २५ हजारहून नागरिक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले.
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या ‘रिव्हर सायक्लोथॉन’ ला यावर्षी प्रचंड गर्दी आणि तरुणाईचा उत्साह दिसत होता. सेलिब्रेटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रॅलीला ग्लॅमर प्राप्त झाले. महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात प्रथमच पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित केलेल्या सायक्लोथॉनला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली असून, या ऐतिहासिक क्षणाचे पिंपरी-चिंचवडकर साक्षीदार आहेत, असा दावा पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.
महेश लांडगे जागतिक विक्रम करतील : चंद्रकांत पाटील
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने झालेली ही रिव्हर सायक्लोथॉन देशातील सर्वांत मोठी आहे. हा विक्रम पुढच्या वर्षी स्वत: लांडगेच मोडतील. आजच्या गर्दीची संख्या पाहता जागतिक विक्रम नोंदवला जाईल. सायकलपटू एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील, ही संस्मरणीय बाब आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी ५० हजारहून अधिक सायकलपटूंची रॅलीसाठी नोंदणी करा, मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करुन उपस्थित राहण्याची विनंती करतो, असे आवाहनही पाटील यांनी केले.
आयुष्य समृद्ध करणारी सकाळ : प्रवीण तरडे
अभिनेता प्रवीण तरडे म्हणाले की, आयुष्य समृद्ध करणारी ही सकाळ आहे. देशाचा तरुण बलाढ्य असेल, तर देश घडवणारा आहे. या ठिकाणी ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत विलोभनीय दिसत आहे. कारण, हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध या सायकल रॅलीसाठी या ठिकाणी जमलेले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी तरुणाईची क्रेझ आहे. हे या ठिकाणी पहायला मिळाले. लोकांचा उत्साह आणि सहभाग पाहून आजची सकाळ संस्मरणीय झाली.
विश्व विक्रमी सायकल रॅली : शेखर सिंह
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, पिंपरी-चिंचवडकर आणि पर्यावरण प्रेमी नागरिक एव्हढ्या मोठ्या प्रमाणात सायकल रॅलीत सहभागी होतील, असे अपेक्षीत नव्हते. मात्र, नागरिकांचा आजचा उत्साह पाहाता केवळ मोठ्या कार्यक्रमांसाठीच नव्हे, तर नियमितपणे सायकलपटूंसाठी प्रशासनाने काम केले पाहिजे. सायकल ट्रॅक आणि संबंधित प्रकल्प गतीमान केले पाहिजेत, याची जाणीव झाली. आतापर्यंतच्या इतिहासात एखाद्या रॅलीला ४ ते ५ हजार सायकलपटू सहभागी झाल्याचे ऐकीवात आहे. आज २० हजारहून अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत, ही निश्चितपणे जागतिक विक्रमाची नोंद आहे, असा विश्वासही शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
“इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलपटू, पर्यावरण प्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचे आभार व्यक्त करतो. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना पिंपरी-चिंचवडकर म्हणून विशेष अभिमान वाटतो. ‘‘पर्यावरणाचा जागर’’ करण्यासाठी पुढकार घेणारी पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र यांसह अनेक संस्था, संघटना आणि अप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या सहयोगाबाबत कृतज्ञता व्यक्त करतो. पर्यावरणाचे संवर्धन करुया.. आपली पवित्र इंद्रायणी वाचवूया.. !!
-(महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.)