पुणे | झुंज न्यूज : राज्यातलं सर्वात जुनं आणि मोठं कारागृह अशी ओळख असलेलं पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह सध्या हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र आहे. कारण येरवडा कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा अडीच पट जास्त कैद्यांना ठेवण्यात आलं आहे.
कोरोनामुळे (Corona) सध्या रोजगार नसल्यानं समाजात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे राज्यातल्या जवळपास सर्व कारागृहांमध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी जागा नसल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे कोरोनाच्या कारणामुळे कित्येक कैदी पॅरोलवर बाहेर आहेत. तरीही कारागृहांमध्ये जागा अपुरी पडत आहे.
येरवडा कारागृहात क्षमेतेपेक्षा अडीचपट कैदी
पुणे आणि परिसरात पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका लावला आहे. पुण्यात आतापर्यंत साडेतीनशे जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात गुन्हेगारांवर धडक कारवाई केली जात आहे.
विविध गुन्हे शाखा आणि पथकांकडून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, मारामारी, जबरी चोऱ्या, अपहरण, खंडणी, फसवणूक अशा गुन्ह्यातल्या आरोपींना कारागृहात पाठवलं जात आहे. याशिवाय कॉम्बिंग ऑपरेशन करूनही जेरबंद केलेल्यांची संख्याही मोठी आहे. यामुळेच २ हजार ४४९ कैद्यांची क्षमता असलेल्या येरवडा कारागृहात ५ हजार ७८२ कैद्यांना ठेवण्यात आलं आहे.
जन्मठेपेच्या कैद्यांची संख्या जास्त
पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह हे राज्यातलं प्रमुख कारागृह आहे. जन्मठेप किंवा इतर दीर्घ शिक्षा झालेल्या कैद्यांना येरवडामध्ये ठेवलं जातं. यामध्ये खून खटल्यात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल चोरीच्या गुन्ह्यात कैदेत असलेल्यांची संख्या आहे. येरवड्यात खूनाच्या गुन्ह्यातले 202 कैदी आहेत तर चोरी प्रकरणातले 79 कैदी आहेत. बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्यांची संख्या 27 आहे.
कोरोनामुळे कैद्यांना सोडलं
राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना कारागृहातल्या कैद्यांनाही त्याचा धोका होता. राज्यातल्या अनेक कारागृहांमध्ये पोलीस आणि कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कच्च्या आणि पक्क्या कैद्यांना पॅरोलवर आणि उच्च न्यायालयाच्या समितीच्या मार्गदर्शनानुसार सोडण्यात आलं होतं. तरीही जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातल्या कारागृहांमध्ये 34 हजार 114 कैदी असल्याचं समोर आलं आहे.