अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे रौप्यमहोत्सवी वर्ष
पिंपरी I झुंज न्यूज : कलाक्षेत्रात जात, पात, धर्म, पंथ नसतो. ह्या क्षेत्राच्या संवर्धनासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही कलाकारच आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले.
बुधवारी (दि. 18 ऑगस्ट) नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भोईर बोलत होते. यावेळी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुहास जोशी, खजिनदार किरण येवलेकर, सह खजिनदार संतोष शिंदे, सदस्य नरेंद्र आमले, गौरी लोंढे, सुदाम परब आदी उपस्थित होते.
“यावेळी भाऊसाहेब भोईर म्हणाले की, दु:खाचे भांडवल करण्यापेक्षा त्याला सक्षमपणे सामोरे जाण्याची प्रेरणा मला पंडीत ह्रद्यनाथ मंगेशकरांमुळे मिळाली. मंगेशकर कुटूंबियांबरोबरच काम करण्याची संधी मला नाट्य परिषदेमुळे मिळाली हे माझे भाग्य आहे. कलाक्षेत्रामुळे लय, ताल कळू लागली पण तोल ढळू दिला नाही. राजकारणात जरी मोठी पदं मिळाली नसली तरी कलाक्षेत्रामुळे मिळालेली श्रीमंत मनाची माणसं आणि पदं मला ‘पद्मश्री’ प्रमाणेच आहेत. पंचवीस वर्षांपुर्वी आदरणीय शरद पवार यांच्या हस्ते आठ ऑगस्टला या संस्थेचे उद्घाटन झाले. मागील पंचवीस वर्षात या शाखेच्या वतीने आशा भोसले पुरस्कार, बालनाट्य स्पर्धा, रामगणेश गडकरी राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा, राज्यस्तरीय कवी संमेलने, पु. ल. देशपांडे लेखन स्पर्धा, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धा, राज्यस्तरीय राजा गोसावी बाल नाट्य शिबीरांचे आयोजन तसेच राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांचे आयोजन मागील पंचवीस वर्षात केले.
दरवर्षी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी आणि नवोदित कलाकारांना ज्येष्ठ कलाकारांच्या नावे विविध सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत चापेकर बंधूंच्या प्रेरणेने संस्थेच्या पंचवीसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोरोनाचे संकट दूर झाल्यावर शहराच्या कानाकोप-यात पंचवीस आठवडे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. तसेच या क्षेत्रात योगदान देणा-या शहरातील काही संस्था, व्यक्ती आणि कलाकार व पत्रकारांचा सन्मान करण्याचेही नियोजन असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि राज्यातील ज्येष्ठ कलाकारांच्या उपस्थितीत रौप्यमहोत्सवी कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. तसेच शहरात एक नाट्यसंकुल उभारण्याचाही संकल्प आहे. या शहरात नाट्य चळवळ वाढीस लागावी म्हणून विविध पक्षांच्या पदाधिका-यांनीही सहकार्य केले आहे, असेही पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले.