काबूल | झुंज न्यूज : तालिबान्यांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानच्या भविष्याचे काय, असा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत आहे. याचदरम्यान आता या देशात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.
देशाचे नवे राष्ट्रपती कोण असतील, याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला असतानाच आज अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला हंगामी राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. सालेह हे अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी ट्विट करून स्वतः हंगामी राष्ट्रपती बनल्याचे जाहीर केले आहे.
अफगाणिस्तानातील एकेक प्रांतावर कब्जा मिळवत तालिबान्यांनी राजधानी काबूलला घेरले. त्यानंतर एकीकडे सत्ता हस्तांतरणासाठी चर्चेला सुरुवात केली. तालिबानचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी राष्ट्रपती भवनामध्ये गेले होते. राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासोबत तालिबान्यांनी चर्चा सुरू केली. याचदरम्यान क्रूर तालिबान्यांपुढे सरकारने शरणागती पत्करली. त्यानंतर लगेच राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पळ काढला आणि शेजारच्या ताजिकीस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.
अफगाणिस्तानच्या संविधानानुसार सालेह राष्ट्रपती
अफगाणिस्तानच्या संविधानानुसार, राष्ट्रपतींची अनुपस्थिती, पलायन, राजीनामा तसेच राष्ट्रपतींचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत पहिले उपराष्ट्रपती हे हंगामी राष्ट्रपती बनतात. त्यानुसार अमरुल्लाह सालेह यांनी हंगामी कालावधीसाठी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीची पदे सूत्रे स्वीकारली आहेत.
“मी सध्या आपल्या देशातच आहे आणि योग्य देखभाल करणारा राष्ट्रपती आहे. मी सर्व नेत्यांशी त्यांच्या पाठिंब्यासाठी तसेच सर्वांच्या सहमतीसाठी संपर्क साधत आहे, असे ट्विट सालेह यांनी केले आहे.
तालिबानने कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती गनी यांचे पलायन
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला.
रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को यांच्या माहितीनुसार, “चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व बसवता आले नाही आणि काही पैसे रस्त्यावर पडले होते.” अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी फेसबुकच्या एका प्रदीर्घ पोस्टमध्ये, घनी यांनी रविवारी सांगितले की ते रक्तपात टाळण्यासाठी आपण हे करीत आहोत.