नवी दिल्ली | झुंज न्यूज : शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात सापडलेल्या दारुच्या बाटल्यांच्या मुद्द्यावरून भाजपला फैलावर घेतलं आहे. त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात. भाजपने या बाटल्या लॅबमध्ये नेऊन तपासाव्यात. त्या किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.
संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा. आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं राऊत म्हणाले.
कल्चरची वाट लावली
मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्याच्या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. दारुच्या बाटल्या सापडणं गंभीर आहे. या घटनेची राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. कोविडच्या बंधनातून दारुच्या बाटल्या मंत्रालयात कशा गेल्या हा विषय नाही. हा कल्चरचा विषय आहे. मंदिरं बंद ठेवून दारूची दुकाने सुरू केली तिथेच कल्चरची वाट लावली. मंदिरांपेक्षा दारूंना महत्त्व प्राप्त झालं. ऑलरेडी गटारीच झाली आहे, असा हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला होता.
दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली.