शिरूर | झुंज न्यूज : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी ज्येष्ठ संचालक ॲड. वसंत कोरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिरूर बाजार समिती चे सभापती शंकर जांभळकर यांनी कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांनी कर्जातील संस्था नावारूपाला आणली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर शंकर जांभळकर यांनी धुरा सांभाळत अडचणीच्या काळात संस्थेचे कामकाज पाहिले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. तसेच पद कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चाही सुरू झाल्या होत्या.
अखेर सभापती पदासाठी शनिवारी झालेल्या निवडी वेळी सर्व संचालकांच्या बहुमताने अखेर ॲड. वसंत कोरेकर या ज्येष्ठ संचालकाच्या नावासमोर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार ॲड.अशोक पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, सर्व संचालक उपस्थित होते. उपसभापती पदाचीही लवकरच निवड
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती विकास शिवले यांनीही कार्यकाळ संपला असल्याने पदाचा राजीनामा दिला असून हा राजीनामा ही मंजूर केला असून लवकरच ही निवड केली जाणार असल्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.