गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व खून करणाऱ्या आरोपींना अटक
थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव भागातील सोळा नंबर येथे रविवारी (दि.०६ जून) रात्री जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तीन जणांनी मिळून पंकज धोत्रे ( रा.थेरगाव, वय २४) या इसमाचा कोयत्याने वार करीत खून केला. वाकड पोलिसांच्या दमदार कामगिरीने एक तासात या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व खून करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सी.सी.टीव्ही ची पाहणी करत तसेच बातमीदाराकडून माहिती घेत प्रथमेश शिंदे (रा. थेरगाव , वय १९) याला गुन्हा झाल्यापासून १ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले
“यावेळी त्याच्याकडून माहिती घेतली असता पंकज धोत्रे व चेतन विटकर, वैभव गायकवाड, मंथन चव्हाण यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. मयत पंकज धोत्रे हा चेतन विटकर यास मारणार आहे अशी अटक आरोपींना माहिती मिळाली होती. त्यामुळे चेतन विटकर, निलेश फडतरे, सुमित हराळे, प्रथमेश शिंदे, मंथन चव्हाण व एक विधीसंघर्षित बालक यांनी मयत पंकज धोत्रे याला जीवे मारण्याचा कट रचला. कटामध्ये पंकजला प्रथमेश शिंदे, मंथन चव्हाण व एक विधीसंघर्षित बालक हे मारणार असे ठरले होते. त्यासाठी त्यांनी हत्यारे जमा केली होती. आरोपी पंकज धोत्रेवर आठवडाभर पाळत ठेवून होते. त्याप्रमाणे पंकज हा रविवारी (६ जून) १६ नंबर बस स्टॉप जवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती आरोपींना भेटली होती. त्यानुसार कट रचून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर विधीसंघर्षित बालकाने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून मुख्य सूत्रधार चेतन विटकर यास फोन करून काम झाले असे कळविल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्व माहितीच्या आधारे वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची ३ वेगवेगळी पथक तयार करून कटाचे मुख्य सूत्रधार चेतन विटकर (वय २६), निलेश फडतरे (वय २०), सुमित हराळे (वय १९) तसेच गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश शिंदे (वय १९ ), मंथन चव्हाण (वय १९) यांना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना ११/ ०६/२०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हि कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, स. पोलीस आयुक्त श्रीकांत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस आयुक्त संतोष पाटील, पोलीस आयुक्त सुनील टोणपे, स. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, स. पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, स. पोलीस निरीक्षक अनिल लोहार, पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दीपक भोसले, वंदू गिरे, विक्रम कुदळे, प्रमोद कदम, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, सागर कोतवाल, मपोशी कोंडे यांनी केली.