पराग कुंकुलोळ यांची “व्हिजन ग्रीन इंडिया” संकल्पना दृष्टिहीन व्यक्तींच्या रोजगाराचे बनली साधन
चिंचवड I झुंज न्यूज : डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या दृष्टिहीन बांधवांनी आता हरित भारताचे स्वप्नं पाहिले आहे. ते साकारण्यासाठी त्यांनी विवीध देशी झाडांच्या बिया मातीत रुजवून अडीच लाखाहून अधिक सिड बॉल ची निर्मिती केली आहे. या उपक्रमातुन भविष्यातील ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिंचवड मधील आस्था हँडी क्राफ्ट्स च्या माध्यमातून व्हिजन ग्रीन इंडिया ही संकल्पना दृष्टिहीन व्यक्तींच्या रोजगाराचे साधन बनली आहे. या व्यक्तींच्या व्यथा,वेदना व गरजा विचारात घेऊन त्यांच्या हाताला काम देण्याचे कार्य येथे होत आहे. कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार गेले आहेत. दिव्यांग बांधवांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांच्या गरजा विचारात घेऊन भारतात हरित क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी ठिकठिकाणी कार्य केले जाते. मात्र वाढते शहरीकरण व विकास कामांसाठी नियमित होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय आहे. यावर मात करीत उद्याचा हरित भारत घडविण्यासाठी अनेक दृष्टिहीन हातांनी अडीच लाखांहून अधिक सिड बॉल तयार केले आहेत. देशी बिया, माती, सेंद्रिय खते यांचा वापर करून हे सिड बॉल तयार केले आहेत.
आपल्या घरातील कुंड्या, परिसरातील मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडेला अथवा दूर रानावनात टाकता येतील असे हे सिड बॉल उद्याच्या ऑक्सिजन निर्मितीची तयारी असणार असल्याचे आस्था हँडीक्राफ्ट्स चे अध्यक्ष पराग कुंकुलोळ व त्यांचे सहकारी प्रणव पाठक यांनी सांगितले आहे. दहा दृष्टिहीन व्यक्ती व सहा गरजू महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
वृक्ष लागवडीसाठी समाजातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते, भटकंती ग्रुप व इतर सेवाभावी व्यक्तींनी या उपक्रमात बनविलेले सिड बॉल मातीत रुजवावेत व दृष्टिहीन बांधवांनी पाहिलेल्या स्वप्नांना साकारण्यासाठी सहकार्य करणे ही खरी गरज आहे.
” दृष्टिहीन व्यक्तींकडे दृष्टी नसली तरीही दूरदृष्टी असल्याने या व्यक्ती विविध कामातून स्वतःला सिद्ध करत आहेत. या व्यक्तींनी लाखो सिड बॉल तयार करून उद्याचा हरित भारत कसा असेल हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील ऑक्सिजन देणारा हा प्रकल्प असल्याने सामाजिक जाणिव म्हणून या प्रकल्पाला सहकार्य मिळणे हीच खरी गरज आहे.
(पराग कुंकुलोळ – आस्था हँडीक्राफ्ट्स, चिंचवड)