पिंपरी I झुंज न्यूज : एकाही कोरोना रुग्णांवर उपचार न करता भोसरीतील दोन कोविड सेंटरला तब्बल सव्वापाच कोटी रुपयांचे बिल पाठवणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलला बिल देण्यात येऊ नये. तसेच हे बिल देणारे या कोविड सेंटरचे चालक व स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी मागणीचे निवेदन पाठविले आहे.
माजी आमदार विलास लांडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “एकही रुग्ण दाखल नसताना भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांनी पाच कोटी २६ लाख साठ हजार आठशे रुपयांचे बिल महापालिकेकडे मागितले आहे. या सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतानाही तसेच तेथे एकाही रुग्णावर उपचार झाले नसतानाही त्यांनी सव्वापाच कोटी रुपयांचे हे बिल मागणे म्हणजे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे. धक्कादायक बाब म्हणजेहे बिल अदा करण्याबाबत स्थायी समितीमार्फत हालचाली सुरू आहेत.
शहरातील प्रामाणिक कर भरणाऱ्या जनतेच्या कोट्यावधी रुपयांवर दरोडा टाकण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकारात महापालिकेचे अधिकारी सामील असल्याशिवाय डॉ. हळकुंदे हे धाडस करणार नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यााविरुद्ध कारवाई केली पाहिजे. सध्याच्या स्थायी समितीची मुदत या महिनाअखेर संपत असल्याने चुकीचे विषय मंजुरीचा अक्षरशः धडाका लावला आहे.
जाता जाता हे सव्वा पाच कोटींचे बिल अदा करण्यासही स्थायी समितीकडून मंजुरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थायी समितीने जनतेच्या पैशांवर दरोडा टाकण्यापूर्वी एकाही कोरोना रुग्णांवर उपचार न करताच सव्वा पाच कोटी रुपये मागणाऱ्या कोविड सेंटरचे चालक व स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.