पुणे I झुंज न्यूज : पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (२१ जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत आहे. सुदैवाने या इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं काम चालत नव्हतं. कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीबाबत भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी शंका व्यक्त केली आहे. हा घातपाताचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न मुक्ता टिळक यांनी उपस्थित केला. तर मुक्ता टिळक यांच्या शंकेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हीच शंका व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?
“ प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यानच त्यांना सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत माहिती मिळाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मलाही व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे”
मुक्ता टिळक काय म्हणाल्या ?
“ दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, अशी माहिती भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.