मुळशी I झुंज : मुळशी तालुक्यातील सूस-नांदे रस्त्यावरती एका खासगी कुटुंबाने राहत्या घरालगत घरगुती स्वरूपाचा कोंबडी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. तेव्हा काही दिवसांपूर्वी त्यांच्या या छोट्या पोल्ट्रीतील चार ते पाच कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. परंतु तो प्रकार त्यावरच न थांबता त्यांच्या दररोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. तेव्हा याबाबतीत त्यांना काहीतरी वेगळी शंका वाटू लागली म्हणून पोल्ट्री मालकाने मागील चार दिवसांपूर्वीच आपल्या मृत कोंबड्याची तपासणी ही औंध येथील प्रयोगशाळेत करून घेतली होती. परंतु दुर्दैवाने त्या तपासणीदरम्यान त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूच्या विषाणूमुळे झाला नसल्याचा अहवाल त्यांना आला.
मात्र, तरीही त्या पोल्ट्रीतील कोंबड्या मरण्याचे न थांबता त्यांच्या मरण्याचे प्रमाण हे वाढतच राहिले. तेव्हा मात्र त्या मृत कोंबड्यांचे आणखी काही नमुने हे तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले. तर त्याचा अहवाल हा नुकताच रात्री उशिरा आला असून, त्यामध्ये ज्या कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तो मृत्यू हा बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हा या आलेल्या या अहवालामुळे संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नांदे येथील संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
“ याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते म्हणाले की, नांदे गावातील शिंदेमळा येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या ठिकाणी जवळपास तीनशे कोंबड्या असून त्या सर्वांची विल्हेवाट लावण्यात येईल याचबरोबर संसर्ग झालेल्या या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्यादेखील नष्ट केल्या जात आहे. तसेच, या परिसरातील दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे.
नांदे गावातील या दुर्दैवी घटनेनंतर नांदे ग्रामपंचायतीने तातडीने मदतीची पावले उचलली असून त्यांच्या वतीने जेसीबी व अन्य आवश्यक सामग्री ही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याविषयी माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितले की, आम्ही नांदेगाव परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना आमच्या वतीने सूचना देण्याचे काम सुरू केले असून जेसीबीच्या साह्याने तातडीने खड्डा घेऊन संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.