पिंपरी I झुंज न्यूज : पाणीपुरवठा विभागाकडील पिंपरी येथील नियोजित पंप हाऊसमध्ये पंपींग मशीनरी बसविणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी ७४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ४९ कोटी ४७ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
महानगरपालिका हद्दीतील रस्त्यामुळे अथवा आरक्षणाने बाधित झालेले काही ठिकाणचे क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. यासाठी खासगी वाटाघाटी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकास खाजगी वाटाघाटीने देण्यास या समितीने मंजूरी दिली. त्यानुसार रहाटणी, पिंपरी, चिंचवड, पिंपळेगुरव, च-होली,पिंपळे सौदागर आणि पिंपरी वाघेरे येथील मिळकतधारकांना सुमारे १४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १३ साईनाथनगर आणि इतर ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची पातळी कमी करून रस्ते विकसीत करण्यासाठी १ कोटी ५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अशुध्द जल उपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्र. ३ योजनेअंतर्गत दाबनलिकेवरील नादुरूस्त स्लुस व्हॉव्ल्ह बदलण्यात येणार आहे. यासाठी ३० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रभाग क्र.३० मधील आवश्यक ठिकाणी मलनि:सारण नलिका आणि चेंबरची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी २९ लाख रुपये तर इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र ३ मोशी-च-होली मधील मलनि:सारण नलिका आणि चेंबरची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. १८ मधील सांस्कृतिक भवन इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी २१ लाख लाख रुपये तर चिंचवड काळेवाडी पूलापासून भाटनगर एस.टी.पी. पर्यंत १८ मीटर रस्त्याचे नदीच्या कडेला बंधारा भिंत बांधण्याकामी ५ कोटी ८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अशुध्द जलउपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्र. ३ आणि ४ योजनेअंतर्गत २०२०-२१ कालावधीकरीता पंपींग मशिनरीची दुरुस्ती विषयक कामे करणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी ५३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रभाग क्र. १५ मधील रोड फर्निचर विषयक कामे करण्यासाठी २२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव येथील गंगोत्रीनगर, विजयनगर आणि प्रभागातील इतर भागात पाथवे, फुटपाथ, स्टॉर्म वॉटर लाईन आदीसाठी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तर प्रभाग क्र. १५ मध्ये फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.