पुणे | झुंज न्यूज : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचाच खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली आहे. हा प्रकार बारामती तालुक्यातील कुतळवाडी येथे घडला. अंगाला दगड बांधून विहिरीत ढकलून देऊन हा खून करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात दीर-भावजयीला अटक करण्यात आली आहे. रामदास महानवर असे मृताचे तर गणेश महानवर आणि मृत रामदास यांची पत्नी ताई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश महानवर यांनी भाऊ रामदास महानवर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली होती. दाखल तक्रारीनुसार तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, रामदास यांचा मृतदेह त्यांच्या पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत एका विहिरीत आढळला.
रामदास यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने पोलिसांना आपल्या तपासाला वेग दिला. त्यांनी शक्य तितक्या नागरिकांची चौकशी केली. तसेच तक्रारदार गणेश आणि मृताची पत्नी ताई यांचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान या दोघांच्याही जबाबात पोलिसांना विसंगती आढळली. त्यानंतर या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी दोघांना केंद्रस्थानी ठेऊन तपासाला सुरुवात केली. सखोल तपास केल्यानंतर खून झालेल्या रामदास यांचा भाऊ गणेश आणि त्यांची पत्नी ताई या दोघांनीच प्रेम प्रकरणातून त्यांचा खून केल्याचे समोर आले. तशी कबुली आरोपी गणेश आणि ताई यांनी दिली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. रामदास यांच्या हत्येमुळे त्यांचा मित्रपरिवार आणि इतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.