चंद्रपूर | झुंज न्यूज : ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वी शीतल यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.
या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आलं आहे. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
डॉ. शीतल आमटे यांचा अल्प परिचय
शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.