पिंपरी I झुंज न्यूज : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दस्त नोंदणीसाठी अव्वाच्या -सव्वा पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करत दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी अॅड. बाळासाहेब थोपटे यांनी केली आहे. याबाबत अॅड. थोपटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नोंदणी महानिरीक्षक आदींना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात २७ सह दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था पुर्णतः ढासळली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने हळूहळू बाजारपेठासह आदी व्यवहार सुरू केले. सरकारला सर्वाधिक महसूल प्राप्त होणारा नोंदणी व मुद्रांक विभागही सुरू केला. राज्य सरकारला मुद्रांक शुल्क विभागामार्फत कोट्यवधी रूपयांचा महसूल मिळत असतो. मात्र, कोरोनासारखे जागतिक संकट आल्याने देशासह राज्यातही लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाच्या या महामारीत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेकांच्या नोकर्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. बेरोजगार झालेल्या नागरिकांनी आपल्या गावची वाट धरली. महाराष्ट्रासह मुंबई, पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण होते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्याची अर्थव्यवस्था ढासळली. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असताना राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा, जीवनाश्यक गोष्टींची दुकाने उघडली. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
राज्याची आर्थिकस्थिती बिकट झाल्याने सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांना शुल्कात सवलत देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिक गुंठा, दोन गुंठे जागा घेऊन आपल्या घराचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दस्त नोंदणीसाठी पैशांची मागणी करत असल्याचा आरोप अॅड. थोपटे यांनी केला आहे. पैसे न दिल्यास कागदपत्रामध्ये त्रुटी काढून नागरिकांना वेठीस धरले जाते. काम होणे महत्वाचे असल्याने काही नागरिक पैसे देतात. वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांचा आदेश असल्यामुळेच आम्ही पैसे घेतो, अशी उत्तरे कर्मचारी नागरिकांना देत आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत नाही ना ? अशी शंका येत आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन सह दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अॅड. थोपटे यांनी केली आहे.