पुणे I झुंज न्यूज : दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या ४३ शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे.
राज्य सरकारनं ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत यापू्र्वीच दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांनी तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिकेकडूनही शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. मात्र, भवानीपेठेतील उर्दू शाळेतील एका शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शाळा सुरु होण्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.
पुणे महापालिकेच्या शाळेत माध्यमिक विभागाचे एकूण २३० शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात अजून काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर शाळा बंदच ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात गेल्या २ दिवसांच्या तुलनेत गुरुवारी ८५९ कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकूण ३६८ कोरोनारुग्ण सापडले होते. सध्या पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ३ हजार ७९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर ५ हजार ८७२ जण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा वाढताना दिसत आहे.