‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ तर्फे स्नेह मेळाव्यात वाकड पुनावळे परिसरातील सोसायटी धारकांशी कलाटेंचा संवाद
वाकड I झुंज न्यूज : राजकारण हे व्यवसायासाठी आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नसून ते खऱ्या अर्थाने जनसेवेसाठी वापरण्याचे काम राहुल कलाटे करत आहेत. कोणीही कधीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. त्यांच्या प्रामाणिक राजकीय धडपडीचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे आमच्या भावी पिढीसाठी, चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुल कलाटे यांनाच आम्ही आमदार करणार असा निर्धार आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी ‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ तर्फे आयोजित स्नेह मेळाव्या दरम्यान केला.
‘फ्रेंड्स ऑफ राहुल’ या मंचातर्फे वाकड येथील हॉटेलमध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी मतदार संघातील हजारो सोसायटी धारकांशी एकत्रित संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी सोसायटी धारकांच्या आणि आयटीयन्सच्या भावी आमदाराविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या. मूलभूत नागरी सोयी सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. “चिंचवडच्या विकासासाठी मला एकदा संधी द्या, तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल”, असा विश्वास यावेळी कलाटे यांनी उपस्थितांना दिला. वाकड, पिंपळे सौदागर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे निलख, गुरव पिंपळे, विशाल नगर, काळेवाडी, थेरगाव, पुनावळे परिसरातील शेकडो आयटीयन्स आणि सोसायटी धारक स्नेह मेळाव्या निमित्त एकत्रित आले होते.
जग पाहिलेला आणि दूरदृष्टी असलेला नेता
ज्या नागरी समस्या सोडविण्यासाठी इतरांना पर्याय देखील सापडत नाही, त्या ठिकाणी फक्त कलाटेच मार्ग काढू शकतात. कलाटे हे बहुतांश जग फिरलेले नेते आहे. त्यामुळे त्यांना शहरात नक्की पायाभूत सोयी सुविधा काय असाव्यात, सुंदर शहर निर्माण करण्यासाठी काय व्हिजन असावे याची पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या अनुभवाचा, दूरदृष्टीचा आणी प्रामाणिक पणाचा आपण सर्वांनी उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांना एकदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली पाहिजे अशा भावना उपस्थित सोसायटी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.