– राहूल कलाटे यांचा भाजप उमेदवारावर खळबळजनक आरोप
चिंचवड I झुंज न्यूज : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अवघे दोन दिवस निवडणुकीसाठी उरले असतानाच चिंचवड मतदारसंघात पैशांचे वाटप करत आदर्श आचारसंहितेचा भाजपकडून भंग करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहूल कलाटे यांनी केला आहे.
चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत पिंपळे गुरव परिसरात सुदर्शन कॉलनी, वैदवस्ती भागातील मतदारांना पैसे व इतर विविध स्वरूपाचे आमिष दाखवण्यात येत असून मतदारांचे ओळखपत्र जमा केल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे.
हि घटना आचारसंहिता भंग करणारी असून. या घटनेसंदभार्त कार्यवाही करावी तसेच संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी मागणी राहुल कलाटे यांचे प्रतिनिधी रोहन जाधव यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम अर्थात आचारसंहिता घालून दिली आहे. निवडणुकीत सहभागी सगळे पक्ष तसेच उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य आहे. असे असताना आचारसंहिता भंग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने मतदारांची मते मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला, तर नागरिकांनी सी-व्हीजिल ॲपद्वारे तक्रार करावी, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून याआधी करण्यात आलेले आहे.