खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा महायुतीवर घणाघाती हल्ला
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा विजय निश्चित, पण गाफील राहू नका – कोल्हे
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड मधील तीनही आमदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले व महायुतीवर त्यांनी घणाघाती हल्ले चढवले.
पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. या संवाद मेळाव्यास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार सचिन आहेर हेही उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, तर महाराष्ट्र यापुढे कोणत्या दिशेने जाणार आहे ती दिशा ठरवणारी निवडणूक आहे. आपण जसा शर्ट, चप्पल खरेदी करतो तसे आमदारही खरेदी करू शकतो हे महायुती सरकारने दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा पराभव टाळण्यासाठी म्हणून, ‘लोकसभा निवडणुकीत झाली मताची कडकी, म्हणून आणली योजना बहिण लाडकी’ असे सांगत कोल्हे म्हणाले की, युती सरकारने आपल्या काळात सामाजिक न्याय विभागाचा निधी मतांच्या खरेदीसाठीच्या योजनांसाठी वळवला आहे. महाराष्ट्रावर या सरकारमुळे साडेआठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, रिंग रोड योजना ही १८००० कोटी रुपयांची मंजूर करण्यात आली होती, मात्र तिचा खर्च चाळीस हजार कोटींवर गेला आहे. हा मलिदा कोणी खाल्ला हे मतदारांना ठाऊक आहे. विकासासाठी व हिंदुत्वासाठी जे तिकडे गेले त्यांना याबाबत आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील युती सरकारने विविध अमिष दाखवून राज्यातील भगिनींची मते खरेदी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी स्वार्थासाठी सर्वसामान्य माणसाचे छप्पर काढून घेतले आणि सांगतात तुम्हाला चादर देतो आहे.
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो त्याग दाखवला आहे त्या त्यागाची जाणीव निश्चितपणे ठेवली जाईल असे सांगत निवडणुका तंत्र बदलले असून आता निवडणुका बुथवर लढल्या जातात त्यासाठी अतिशय सतर्क रहावे लागते. असे सांगत शिरूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी बूथ यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेमुळे चौदाशे ईव्हीएम मशीन आम्ही बदलून घेतले व त्यामुळे माझा विजय झाला अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पिंपरी विधानसभेचे सर्व सर्वेक्षण अहवाल आलेले असून त्यात विद्यमान आमदारांचा पराभव होणार असा अभिप्राय आहे. त्यामुळे ही आपल्याला मिळालेली संधी आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा विजय निश्चित आहे, पण आपण गाफील राहून चालणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सुलक्षणा शिलवंत उमेदवार म्हणजे शरदरावजी पवार उमेदवार, सुलक्षणा शिलवंत उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब उमेदवार, सुलक्षणा शिलवंत उमेदवार म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार, असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या संवाद मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाला की, गेल्या वर्षभरात राज्यातील सर्व पक्षात फोडाफोडीचे राजकारण भाजपाने केले आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात आता सर्वच मतदारांना बदल अपेक्षित आहे. ही लढाई केवळ माझी एकटीची नसून महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष व कार्यकर्त्यांची आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले की, विद्यमान आमदाराने गेल्या दहा वर्षात केलेली कोणतीही पाच कामे दाखवून द्यावीत. असे सांगत गौतम चाबुकस्वार म्हणाले की, मी स्वतः उमेदवार आहे असे मानून माझी बहीण सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा मी सांभाळणार आहे. माझ्या बहिणीच्या हातून विद्यमान आमदाराचा पराभव व्हावा असे निसर्गाचे नियोजन आहे. असे सांगत या निवडणुकीत महायुती गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सावध राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रकाश म्हस्के यावेळी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सर्वच घटक पक्षांना एकत्र करून बरोबर जाण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्याचबरोबर या सर्वांना समान न्याय दिला जाईल असे सांगत ते म्हणाले की, भाजपाला राज्यातून घालवायचा आहे. त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी यावेळी पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदारांवर घणाघाती हल्ला चढवला त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगत ही निवडणूक बदमाश विरुद्ध नम्र व सुशिक्षित सुलक्षणा शिलवंत अशी असल्याचे ते म्हणाले.
या संवाद सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी गौतम आरगडे, शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेवक बाबू नायर, शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, काँग्रेसच्या निगार बारस्कर आदींची भाषणे झाली.
या संवाद मेळाव्यास दत्तात्रय वाघेरे, मनोज कांबळे, रोमी संधू, युवराज दाखले, प्रदीप पवार, धम्मराज साळवे, युवक राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष इमरान शेख, चेतन पवार, काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, अमोल निकम, हाजी दस्तगीर, अशोक मोरे, विश्रांतीताई पाडाळे, बी. डी. यादव, अभिमन्यू दहीतुले, नरेंद्र बनसोडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, उमेश खंदारे, शामलाताई सोनवणे, अनिताताई तुतारे आदी प्रमुख उपस्थित होते.
या मेळाव्यास महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सी पी आय, सी पी एम आदी प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले.
आणि कार्यकर्ते ही भारावून गेले
पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार यांनी संवाद मेळाव्यात भाषण केल्यानंतर त्या मंचकावरून खाली उतरल्या व त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना त्रिवार अभिवादन केले त्यानंतर त्या मंचकाच्या दिशेने वळल्या व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना त्रिवार अभिवादन केले त्यांच्या या अभिवादनामुळे सभागृहातील वातावरण भावपूर्ण झाले अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात त्यामुळे अश्रू तरळले.