पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाचे महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाचे अधिकृत उमदेवार बाळासाहेब ओव्हाळ यांचा निर्धार
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन रविवारी प्रमुख कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी ओव्हाळ यांना पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत एबी फॉर्म देऊन त्याची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे ओव्हाळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
मंगळवारी सकाळी ओव्हाळ यांनी पिंपरी एच. ए. कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा जोतीराव फुले स्मारक, अहिल्याबाई होळकर पुतळा, चिंचवड स्टेशन येथील विर लव्हूजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके पुतळा, निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आकुर्डी येथील खंडोबा देवस्थान येथे दर्शन करून शंभर घोडेस्वारांसह दिमाखात रॅलीला सुरुवात केली. आकुर्डी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे रॅलीचा समारोप करून निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे, विनोद कांबळे, सचिन सकाटे, राजाभाऊ वावरे, निशाताई ओव्हाळ, अभिजित भालेराव, सतिश राठोड, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
शंभर घोडेस्वरांसह पहिल्या दिवशी काढलेल्या रॅलीत महिला व तरुण मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते. संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण तसेच बहुजन व मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली भूमिका आणि त्याला महाराष्ट्रात मिळत असणारा प्रतिसाद पाहता बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांसमोर पहिल्या दिवसांपासून तगडे आव्हान उभे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीनुसार आपण काम करणार आहोत. तसेच तरुणांच्या हातात हत्यार नाही तर हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी काम करणार असल्याचे बाळासाहेब ओव्हाळ यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.