शिरूर I झुंज न्यूज : गवळीबाबा तरुण मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आरतीचा मान पंचायत समितीच्या माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष आरती महेश भुजबळ यांनी स्वीकारला व आरतीला उपस्थित राहून महिलांना लाख मोलाचे मार्गदर्शनही केले.
यावेळी आरती भुजबळ यांनी महिलांसह देवीची गाणी गायली तसेच गवळीबाबा तरुण मंडळाच्या वतीने संगीत खुर्चीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्येही त्यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतला. गवळीबाबा तरुण मंडळांनी पाठीमागे गणेशउत्सव काळात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरातील सहभागी महिलांना त्यांचे ब्लड रिपोर्ट वाटण्यात आले. तसेच डॉक्टर टेमगिरे सूर्य हॉस्पिटल शिक्रापूर यांच्या टीमने उपस्थित राहून उपचार व मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलांची तब्येतीविषयी घ्यावयाची काळजी व मोलाचे सल्ले दिले.
गवळीबाबा नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध छोट्या छोट्या मनोरंजन देणाऱ्या स्पर्धांचे भरगच्च आयोजन केलेले आहे. मंडळाच्या वतीने वस्तीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, शिवजयंती उत्सव यांसह अनेक छोटे-मोठे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लवकरच मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे यांनी केले व हिरकणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्रांजल मुळे यांनी आभार मानले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.