पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांचे तहसीलदारांना निवेदन
पिंपरी : झुंज न्यूज : बदलापूर येथे झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणारे तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणारे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी बुधवारी नायब तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली.
बदलापूर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारा संदर्भात जन आक्रोश निर्माण झाला होता. यावेळी वृत्तांकन करत असलेल्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांनी अर्वाच्य व अश्लील भाषा वापरली व स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकारासंदर्भात पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी आज नायब तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देऊन वामन म्हेत्रे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष गोविंद वाकडे, मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष पराग कुंकूलोळ , जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, टीव्ही 9 चे प्रतिनिधी रणजित जाधव, साम मराठीचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे, मुंबई तकचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, एनडी टीव्ही चे प्रतिनिधी सूरज कसबे, औदुंबर पाडळे, महादेव म्हासाळ , संतोष चव्हाण, नाना कांबळे, बापू गोरे, लीना माने, विशाल जाधव, राम बनसोडे, दिलीप देहाडे, संजय धुतडमल, देवा भालके, गणेश शिंदे, आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी गोविंद वाकडे म्हणाले की, बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर महिला पत्रकार भगिनीला अश्लील भाषेत बोलणाऱ्या आणि अपमानित करणाऱ्या वामन म्हेत्रेंवर कायदेशीर कारवाई करून महिला पत्रकार देखील सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत हे दाखवून द्यावे.
ज्येष्ठ पत्रकार सचिन चपळगावकर यांनी सांगितले की, मोहिनी जाधव यांच्या संदर्भात वामन म्हेत्रे यांनी केलेले वर्तन हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराइतकेच गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. यापुढे असे प्रकार घडल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.