भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीच्या हद्दीत कोणत्याही शाळेत जाण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा पास देण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आपल्या हद्दीतील पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांनी बसपाससाठी केवळ २५ टक्के रक्कम भरावयाची आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा प्रवासी पास दिला जातो. त्याचा या शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी वापर करता येत आहे. मात्र या सवलतीच्या पासचा लाभ केवळ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीपुरताच विद्यार्थ्यांना घेता येत होता. हा नियम पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा होता. दुसरीकडे पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी मात्र वेगळा नियम केला गेला आहे. पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलमार्फत देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासचा वापर पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए या तीनही नियोजन संस्थांच्या हद्दीत करण्याचा नियम आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना केवळ आपल्याच महापालिका हद्दीत सवलतीच्या पासचा लाभ घेण्याची सक्ती करण्यात आली होती.
ही बाब लक्षात आल्यानंतर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांवर पीएमपीएमएलच्या सवलतीच्या बसपास संदर्भात होणारा अन्याय दूर करण्यास सांगितले. या शहरातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासचा लाभ पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए या तीनही नियोजन संस्थांच्या हद्दीत घेता यावा यासाठी नियमात बदल करण्यात यावा. या बदललेल्या नियमाची चालू शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी सुरू करून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीच्या हद्दीत कोणत्याही शाळेत जाण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत सवलतीचा पास देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
त्याची दखल घेत ६ ऑगस्ट रोजी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील कोणत्याही शाळेत जाण्यासाठी बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चालू शैक्षणिक वर्षापासूनच अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना आता केवळ २५ टक्के रक्कम भरून पीएमपीएमएलचा सवलतीचा पास उपलब्ध होईल. या निर्णयाचा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
शंकर जगताप – शहराध्यक्ष पिंपरी-चिंचवड भाजपा
पीएमपीएमएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी निर्माण करण्यात आलेली संस्था आहे. या संस्थेवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका संयुक्तपणे खर्च करत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी संचलन तुटीपोटी कोट्यवधी रुपये अनुदान देत आहे. असे असताना या दोन्ही शहरातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासच्या लाभाबाबत पुणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी वेगळा नियम आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी वेगळा नियम करणे म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यासारखेच होते. पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांनाही आपल्या महापालिका हद्दीबाहेर शिक्षण घेण्यासाठी सवलतीचा बसपास मिळावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसामान्य कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसपासमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला याचा मला आनंद आहे.