– शिवांजली सखी मंचच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
– भोसरी विधानसभा मतदार संघात तब्बल २५ ठिकाणी कार्यक्रम
पिंपरी I झुंज न्यूज : महिलांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे ‘‘मंगळागौरी’’. आधुनिक युगाशी स्पर्धा करताना शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि सण-उत्सव साजरा करण्यासाठी अनेकदा मर्यादा येतात. मात्र, महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले, तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातो. याचा प्रयत्य भोसरी विधानसभेतील ‘‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’’ कार्यक्रमात येतो आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘‘इंद्रायणी थडी’’ भरवणाऱ्या शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
“शिवांजली सखी मंच्या अध्यक्षा पुजा लांडगे म्हणाल्या की, ‘‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’’ हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केला आहे. प्रतिवर्षी आम्ही श्रावण मास आणि मंगळागौरी सणानिमित्त विविध कार्यक्रम घेत असतो. यावर्षी प्रसिद्ध सादरकर्ते आकाश फल्ले आणि रमेश परळीकर यांच्या सूत्रसंचालाने कार्यक्रमांची रंगत वाढलेली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा मतदार संघातील भोसरी, डुडुळगाव, मोशी, दिघी, तळवडे, चऱ्होली, वडमुखवाडी, चिखली, इंद्रायणीनगर, संतनगर, पूर्णानगर, शरदनगर, स्पाईन रोड, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, देहु-आळंदी रोड, हुतात्मा चौक, भोसरी, जाधववाडी, चिखली अशा विविध २५ ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमांमध्ये विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज, द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी पिठाची गिरणी, चतुर्थ क्रमांसाठी मायक्रो ओव्हन, पाचव्या क्रमांसाठी मिक्सर अशी बक्षीसे दिली जात आहेत. त्या-त्या परिसरातील महिलांचा या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“रोजच्या धावपळीच्या जीवनात माता-भगिनींना थोडा ‘‘ME TIME’’ मिळावा. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. मंगळागौरीचा सण त्यांना उत्साहाने साजरा करता यावा. या करिता मतदार संघातील विविध गावांत ‘‘सण महिलांचा…खेळ आनंदाचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा’’ या संकल्पनेतून ‘‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’’ असा कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता. शिवांजली सखी मंच आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, याचे समाधान वाटते.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.