मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी I झुंज न्यूज : ताथवडे येथील प्रस्तावित जागेमध्ये पब्लिक युटीलिटीसाठी ५ एकर अतिरिक्त जागा खरेदी करण्यात यावी असे निवेदन भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे म्हणाले कि,पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्येचा विचार करून ताथवडे येथील पशु संवर्धनाची १३ एकर जागा खरेदी करून सदर जागेमध्ये प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), पाण्याच्या टाक्या, अग्निशमन केंद्र विकसित करण्यासह वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत.
सद्यस्थितीला डांगे चौक ते पुनावळे तसेच भूमकर चौक ते बिर्ला रुग्णालय पर्यंतच्या रस्त्यावर गोरगरीब नागरिक भाजी विक्री,मत्स विक्री, इत्यादी व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहेत. सदरील रस्ते हे हिंजवडी व पुणे शहराकडे जाणारे मुख्य रस्ते असल्यामुळे या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते. होणारी वाहतुकीची हि समस्या रोखण्यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर महापालिकेमार्फत स्पाईन रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
विकास आराखड्यात ताथवडे येथील जागेचा समावेश करण्यात आला आहे. या जमिनीवर नागरी सुविधांची काही आरक्षणे टाकण्यात आली आहेत.या आरक्षणा बरोबर महापालिकेच्या वतीने आराखडा तयार करताना भविष्याचा विचार करून भाजी मंडई व इतर छोट्या स्वरूपाच्या व्यावसायिकांचा विचार करून अतिरक्त ५ एकर क्षेत्रफळावर पब्लिक युटीलिटीसाठीचा देखील प्रस्तावामध्ये समावेश करण्यात यावा.
“शहराच्या मध्यवर्ती ठिकाणची आवश्यक असणारी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास पशुसंवर्धन विभाग सकारात्मक आहे. महापालिकेला आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधांमध्ये सर्वसामान्य कष्टकरी नागरिक व होत असलेल्या वाहतूक कोंडीचा विचार करून पब्लिक युटीलिटीसाठी अतिरक्त ५ एकर क्षेत्रफळाचा समावेश करून नवीन प्रस्ताव तयार करून सादर करण्यात यावा.अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.