आमदार महेश लांडगे यांचे आवाहन ; ‘परिवर्तन हेल्पलाईन’शी संपर्क करा, समस्या सोडवा
पिंपरी I झुंज न्यूज : मान्सूनपूर्व तयारीसह आता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विनापरवानगी किंवा पावसाळ्यात बेकायदेशीरपणे रस्ता खोदाई केल्यास संबंधित ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेकेदार कंपन्या आणि संबंधितांना मनमानीपणे खोदाई करण्याला लगाम बसला आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बैठक घेतली. त्यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
शहरात विविध ठिकाणी विविध कारणांनी रस्त्यांची खोदाई केली जाते. पावसाळ्यात अशी खोदाई सुरू ठेवल्यामुळे खड्डे पडणे, पाणी साचणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे आणि वाहतूक कोंडी होणे. यासह अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होते. विशेष म्हणजे, काही ठेकेदार कंपन्या किंवा खासगी जागामालक महापालिकेची परवानगी न घेता खोदाई करतात. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांना होतो. त्यामुळे पावसाळ्यात खोदाई पूर्णत: बंद करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली होती.
शहरात विविध सेवा वाहिन्यांच्या कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे शहरातून वाहने चालविणे अवघड होते. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. ते टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, जलनिस:रण वाहिका, पावसाळी गटारे, इंटरनेट आणि अन्य केबल, एमएनजीएल तसेच, वीज वाहिन्यांची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच करावीत, असे आदेश दिले होते. तसेच, दि. १५ मेपासून खोदकामास परवानेही बंद केले आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.
“शहरात रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. रस्ते खोदाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्ते खोदाईला परवागनी देवू नये, अशी सूचना केली आहे. महापालिका प्रशासनाने दि. १५ मेपर्यंत खोदाईची कामे पूर्ण करण्याची आदेश दिले होते. त्यानंतर खोदाईवर बंदी घातली आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघात खोदाईमुळे कुठे असुविधा होत असेल, तर नागरिकांनी ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’ शी संपर्क करावा.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.