दिलीप मोहिते पाटलांचा खासदार कोल्हेंवर घणाघात
पुणे I झुंज न्यूज : सुरूवातीला नाराज असलेले अजितदादा गटातील नेते आमदार दिलीप मोहिते पाटील आता शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांच्या समजुतीनंतर आता सगळेच नेते झपाटून कामाला लागले आहेत. अशातच आढळरावांचा प्रचार करत असतांना दिलीप मोहिते पाटलांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महायुतीकडून दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. यातच एका कार्यक्रमात दिलीप मोहिते पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका करत खोचक टोला हाणला आहे. मागच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं. त्यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणलं. परंतु मला त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही. असा टोमणा मोहिते पाटलांनी कोल्हेंना लगावला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात. लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलं. त्यामुळे संसदेत आणि विधानसभेत प्रश्न मांडले तर आम्ही उपकर करत नाही. तुम्ही संसदेत प्रश्न मांडले , मी विधानसभेत मांडले, लोकांनी प्रश्न मांडण्यासाठी आपापल्या निवडून दिले आहे. त्यामुळे आपण उपकार करत नाही. अशा शब्दात मोहिते पाटलांनी कोल्हेंना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
दरम्यान, मागच्या निवडणुकीत कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला. मात्र यावेळी अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटलांचं मोठं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आढळरावांच्या पाठीमागे अजितदादांसह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मोठी ताकद असणार आहे. या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभेत पाच आमदार महायुतीसोबत आहेत. त्यामुळे कोल्हेंना विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.