पिंपरी | झुंज न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ मध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना मांडली आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठीच एलपीजे इनोव्हेशन ऍवॉर्डस् ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली कल्पकता आणि नवकल्पना पुढे यावी. याच विद्यार्थ्यांमधून पुढे देशाचे मोठे शास्त्रज्ञ, उद्योजक घडावेत हा उद्देश समोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात आली. यापुढे दरवर्षी ही स्पर्धा भरवून विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना वाव देणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शनिवारी (दि. १६) सांगितले.
शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा अकादमीच्या वतीने शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “एलपीजे इनोव्हेशन ऍवॉर्डस २०२४” या स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. नवी सांगवीतील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी स्पर्धेचे परीक्षक डॉ. सतीश मिश्रा, प्रा. डॉ. मुकेश अग्रवाल, प्रा. डॉ. मंजिरी शर्मा, प्रा. शरद गुप्ता, मुख्याध्यापिका स्वाती पवार, इनायत मुजावर, भाजपचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडिगेरी, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा अकादमीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, गणेश सहकारी बँकेचे संचालक प्रमोद ठाकर, राज सोमवंशी, सागर फुगे, प्रा. प्रल्हाद झरांडे, प्रताप बामणे, डॉ. विकास पवार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी “विज्ञान”, “पर्यावरण”, “डिजिटलायझेशन”, “शाश्वत स्मार्ट सिटी”, “रेव्हेन्यू”, “हेल्थ एंड वेलनेस”, “कल्चर एंड हेरिटेज”, “वेस्ट मॅनेजमेंट”, “अर्बन मोबिलाइझेशन”, “ई-गव्हर्नन्स” आदी विषयांवर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्जनशील, कल्पक आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याचे किंवा कल्पना सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी अकादमीने शहरातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती निर्माण केली होती. ५ डिसेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित या स्पर्धेत शहरातील एकूण ३९ शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील तब्बल ६१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पहिल्यांदाच आयोजित केलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील ४९४ विद्यार्थी या स्पर्धेत पात्र ठरले.
या विद्यार्थ्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रकल्प सादर केले. दिपू सुरेशकुमार मोरे, यस्वी गुलशन मल्होत्रा, शुभ शशिकांत म्हात्रे, शुभम सिद्धनाथ जानकर, संतोषी हरियत राजपुरोहित, प्रांजल कृष्णा वागळे, प्रज्वल बी. आर., प्रत्यय शरण स्वामी, आर्यन गोगले, प्रियदर्शनी उत्तम वायसे, पांडुरंग विलास जेतकर, मृदुला संदीप खेडकर, ऋषीकेश शरद मेमाणे, सानिका संतोष सप्रे आणि सोहम शिवाजी गोगरे यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप व चषक, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना टॅबलेट व चषक तसेच परीक्षकांनी निवडलेल्या विजेत्यांना स्मार्ट वॉच व तषक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे “द गाईडींग लाईट” हे पुस्तक देऊन प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “भारत एक नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित राष्ट्र करण्याची गॅरंटी दिली आहे. ही गॅरंटी पूर्ण करण्यासाठी नवीन शोध, नवीन संकल्पना आणि नवनवीन तंत्रज्ञान पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी “एलपीजे इनोव्हेशन ऍवॉर्डस २०२४” ही स्पार्धा आयोजित करण्यात आली होती. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सर्जनशील वृत्ती निर्माण करण्याचा उद्देश होता. त्याला शहरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला आहे. नावीन्य, ज्ञान, पारदर्शकता आणि स्पर्धेचे हे युग आहे. या युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ही स्पर्धा ठरली आहे. त्यातून पिंपरी-चिंचवडमधील अनेक विद्यार्थी देशाचे मोठे शास्त्रज्ञ, उद्योजक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”
परीक्षक प्रा. डॉ. मंजिरी शर्मा म्हणाल्या, “या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अनपेक्षित होता. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प सादर केले आहेत. या प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेली कल्पकता थक्क करणारी आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन कल्पक, सर्जनशील दृष्टीकोनोतून नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. क्रिटिकल थिंकिंग, समस्या सोडवणे, सॉफ्ट स्किल्स विकसित करणे, कल्पकता आणि सैद्धांतिक ज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर करून विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प सादर केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किती सखोल तात्रिक ज्ञान आहे, याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शिंदे व स्वाती येवले यांनी केले. आकांक्षा सोनवणे यांनी आभार मानले.