पुणे I झुंज न्यूज : शहर परिसरातील उपेक्षित घटकांतील एचआयव्हीग्रस्त, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व गरीब लोकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, या उद्देशाने पर्णकुटी या स्वयंसेवी संस्थेने सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने 920 पोषण किटचे वाटप करण्यात आले.
बुधवार पेठेत आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सह्याद्री हॉस्पिटल्सच्या सीएसआर टीमच्या सीएस अस्मिता कुलकर्णी आणि सीए धनश्री निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्णकुटी संस्थेच्या संस्थापिका स्नेहा भारती, हॉस्पिटलचे संचालक व सीईओ अब्रारअली दलाल उपस्थित होते.
पोषणाचा आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेणे अत्यावश्यक बनले आहे. विशेषतः वंचितांसाठी आणि एचआयव्हीशी लढा देत असलेल्यांसाठी हे महत्त्वाचे आहे. पर्णकुटी संस्थेची स्थापना या उद्देशाने झाली आहे. समविचारी संस्थांशी हातमिळवणी करून एक शाश्वत आणि पोषक भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे, असे अब्रारअली दलाल यांनी सांगितले.
स्नेहा भारती यांनी सांगितले, की पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांची मुले, एच.आय.व्ही. संसर्गित व बाधित व्यक्ती, तसेच ट्रान्सजेंडर व्यक्ती व समाजातील इतर वंचित समुदायासाठी पर्णकुटी संस्था कार्यरत आहे.